अनंत चतुर्दशी…

0 63

बाप्पा चालले आपल्या गावाला,
चैन पडेना आमच्या मनाला,
ढोलच्या तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला,
वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला…
भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी असे म्हणतात. यंदा अनंत चतुर्दशी २८ सप्टेंबरला येत आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन केले जाते. त्यामुळे हा दिवस आपल्याला विसर्जनाचा दिवस म्हणूनच लक्षात राहतो. पण हा दिवस फक्त विसर्जनासाठी नसून या दिवशी अनंत म्हणजे विष्णूची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात.

अनंत व्रत करण्याचा दिवस म्हणजे विष्णुरूपी शेषनागाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस मानला जातो. त्यादिवशी विष्णूच्या क्रियाशक्तीरूपी लहरी कार्यरत होत असून शेषदेवता विष्णुशी संबंधित असलेली पृथ्वी, आप आणि तेज या लहरींचा उत्तम वाहक मानली जाते. त्यामुळे शेषाला या पूजेत महत्वाचे स्थान दिले जाते.

 

गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापन केलेल्या गणपती बाप्पाचे विसर्जन ११ व्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी केले जाते. यामागची पौराणिक कथा अशी आहे की, ज्या दिवशी वेद व्यासजींनी महाभारत लिहिण्यासाठी गणपती बाप्पाना महाभारताची कथा सांगण्यास सुरुवात केली तो दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी होती. कथा सांगताना वेदव्यासजींनी डोळे मिटले आणि सलग १० दिवस ते गणेशजींना कथा सांगत राहिले आणि गणेशजी लिहित राहिले.

 

१० व्या दिवशी जेव्हा वेदव्यासजींनी डोळे उघडले, तेव्हा त्यांनी पाहिले की गणेशजींच्या शरीराचे तापमान एका ठिकाणी बसून सतत लिहित असताना अतिशय वाढले होते. अशा परिस्थितीत गणपतीला शीतलता देण्यासाठी वेद व्यासजींनी त्यांना थंड पाण्यात डुबकी घेण्यास सांगितले होते, त्यामुळे त्यांना आराम वाटला होता.

 

जिथे गणपती वेदव्यासजींच्या सांगण्यावरून महाभारत लिहित होते, त्याठिकाणी अलकनंदा आणि सरस्वती नद्यांचा संगम होतो. ज्या दिवशी श्री गणेशांनी सरस्वती आणि अलकनंदाच्या संगमात स्नान केले, तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता. म्हणूनच चतुर्थीला स्थापना झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन केले जाते.

 

भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते. यावर्षी २८ सप्टेंबर २०२३ रोजी साजरे केले जात आहे. या दिवशी हे व्रत आचरावे, असे म्हटलं जाते. या दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा केली जाते व अनंताचे व्रत साजरे केले जाते. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे यासाठी सतत चौदा वर्षे, चौदा गाठी असलेला रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात.

 

भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते. अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही असा आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती. म्हणून या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणतात. गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्रीविष्णु देवतेला अनुसरून केल्या जाणार्‍या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन करण्याला महत्व आहे.

 

पांडवांना द्यूतात हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला होता. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत चतुर्दशीचे व्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला, अशी कथा आहे. श्रावण महिना सुरू झाला की, आपल्या सणावारांना प्रारंभ होतो. दरवर्षी नागपंचमीपासून सणांना सुरवात होऊन त्यातील एक पर्व अनंत चतुर्दशीला संपते. अनंत हे एका महानागाचे नाव असले तरी अनंत हे विष्णुचे देखील नाव आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णुची ‘अनंत’ ह्या नावाने पूजा केली जाते. या व्रताची सुरुवात अनंताचा दोरा सापडल्यास अथवा कोणी सांगितले असल्यास केले जाते. आणि मग ते त्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या चालू राहते.

 

अंगपूजा, आवरणपूजा, नामपूजा अशा आणखी अंगभूत पूजांचा यात समावेश केला जातो.
१४ प्रकारची फुले,
१४ प्रकारची फळे,
१४ प्रकारची धान्ये आणि
१४ प्रकारचे नैवेद्य दाखवून एका दोरकासह अनंताची पूजा केली जाते.
वडे आणि घारगे, तसेच १४ प्रकारच्या भाज्या अश्या प्रकारच्या पंच पक्वान्न यांचे नैवेद्य दाखवून व्रत देवतांचे विसर्जन केले जाते.

लोकमान्य टिळकांनी स्वराज्य स्थापनेच्या राष्ट्रीय हेतूने गणेशोत्सव सुरू केला आणि त्याचा कालावधी दहा दिवस इतका निश्चित केला. त्यानुसार अनंत चतुर्दशीला महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी दहा दिवसांच्या  गणपतीचे विसर्जन करतात.

 

जलाशयात मूर्ती विसर्जित करावयाच्या असा धर्मनियम असल्यामुळे समुद्र, नद्या, विहिरी अशा ठिकाणी गणेशभक्त वाजतगाजत जाऊन मूर्तीचे विसर्जन करतात. सगळीकडे आनंदाचा जल्लोष चालू असतो.
आभाळ भरले होते तु येतांना,
आता डोळे भरून आलेत तु जातांना,
काही चुकलं असेल तर माफ कर,
गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षा लवकर या….!

ज्योती कुलकर्णी, मुंबई
लेखिका, स्पेशल एजुकेटर व समाजसेविका  

error: Content is protected !!