बजरंग बली की जय – हनुमान जयंती विशेष लेख

0 18

 

“बजरंग बली की जय” असा जयघोष करणारे भक्त हनुमानाला जयंती दिवशी त्याची पूजाअर्चा, कीर्तन यातच गुंग असतात. हनुमान जयंती म्हणजे हिंदु देवता हनुमान यांचा जन्म दिवस. चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते. भक्त कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो अशी कथा आहे. वानर गणांचा मुख्य केसरी आणि त्याची पत्नी अंजनी त्यांचा हनुमान हा पुत्र आहे. तो रामाचा निस्सीम भक्त असल्यामुळे हनुमानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हनुमान पूजा शनिवारी आणि मंगळवारी केली जाते. मारुतीला शेंदूर, तेल आणि रुईची फुले, पाने अर्पण करण्याची प्रथा आहे. दर शनिवारी फक्त मारुतीला तेल अर्पण करून आशीर्वाद मागतात. नारळदेखील फोडला जातो. उत्तर भारतात सुद्धा हनुमानाची उपासना केली जाते. तुळसदास विरचित हनुमान चालीसा यातून आपणाला ज्ञात आहेच.

समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रात अकरा ठिकाणी हनुमानाची मंदिरे स्थापन केली. हनुमान म्हणजे बलोपासनेचे दैवत. त्यामुळे रामदास स्वामिनी जागोजागी आखाडे बांधले आणि शक्तीचे महत्त्व प्रतिपादित केले. रामदास स्वामी यांनी रचलेले ‘भीमरूपी महारुद्रा’ हे मारुती स्तोत्र महाराष्ट्रात मुख्य स्त्रोत आहे.

 

हनुमान श्रीरामाचे परमपूज्य भक्त होते. कथा सांगितली जाते की त्यांनी छाती फोडून रामाची छबी दाखवली. हनुमानाला एकदा मोत्याची माळ सापडली असता त्यांनी प्रत्येक मोती फोडून आत राम आहे का हे पाहिले. त्यांच्या ठाई राम हेच सर्वस्व आहे. अलंकाराला काही किंमत नव्हती. श्री राम, सीता आणि लक्ष्मण वनवासासाठी फिरत होते तेव्हा हनुमान त्यांचे रक्षणासाठी सदैव तत्पर असे. रावणा सोबत च्या युद्धात लक्ष्मणाला मुर्छा आल्यानंतर त्याचे प्राण संजीवनी बुटीने वाचणार होते. संजीवनी बुटी आणण्याकरता हनुमान समुद्रापार गेला आणि द्रोणागिरी उचलून त्याने लक्ष्मणाचे प्राण वाचवले. सीता माईला रावणाने पळवून नेऊन लंकेला अशोकवनात ठेवले असता समुद्रपार करुन हनुमानाने सीता माईला रामाची अंगठी नेऊन दिली. जेव्हा रावणाच्या सैनिकांनी हनुमानाला पकडले तेव्हा त्याच्या शेपटीला आग लावुन दिली.त्यावेळी त्याने आपल्या शेपटीने पूर्ण लंका जाळून टाकली.आजही हनुमान जिवंत आहे असे मानले जाते.

 

हनुमानाला मारुती, बजरंगबली, रामभक्त, अंजनी, महावीर, पवनपुत्र, पवनसुत, केसरी नंदन अशा नावांनी बोलले जाते. हनुमानाचे शस्त्र शक्तीचे प्रतिक असणारी गदा आहे. हनुमानाचा जन्म अंजनेरी पर्वतावर माता अंजनीच्या पोटी झाला आहे. हनुमानाचे वडील केसरी. जन्म झाल्या झाल्या बालहनुमानाने सूर्याच्या गोळ्याला खाण्यासाठी उड्डाण केले. तेव्हा इंद्रदेवासह सर्वच देव भयभीत झाले. इंद्र देवाने सूर्याला व पृथ्वीला वाचविण्यासाठी आपले वज्र हनुमानाकडे फेकले. त्यामुळे हनुमान मूर्च्छित झाला. पवनदेवाने सर्व सृष्टीतील वायू ओढून घेतला आणि तेव्हा देवतांनी हनुमानाला मूर्छितावस्थेतून बाहेर आणले. श्री राम आणि रावण यांच्यात युद्ध चालू असता हनुमान आणि वानर सेनेच्या बळावरच रामाने रावणाशी युद्ध केले आणि जिंकले. हनुमान जयंतीला कीर्तनानंतर प्रसाद वाटप केले जाते.

सौ.भारती सावंत
खारघर, नवी मुंबई

error: Content is protected !!