मोठी बातमी…माजी मुख्यमंत्र्यावर कारवाईचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश

0 342

राज्यातील पाचव्या टप्प्यातील आणि विशेषत: मुंबईतील मतदान सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जिथे शिवसेनेची मते आहेत, तिथे मतदान प्रक्रिया संथ गतीने पार पडत असल्याचा आरोप केला होता. मतदान प्रक्रिया सुरू असताना घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. याच तक्रारीची दख घेऊन राज्य निवडणूक आयोगाने कारवाई करावी, असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकालाच्या आधीच ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

 

उद्धव ठाकरेंविरोधात खटला दाखल होण्याची शक्यता 

आचारसंहिता भंग झाल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा देखील नोंदवण्याची शक्यता आहे. तसेच राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून या विषयी निर्णय घेण्यात येईल. त्यांच्याविरोधात खटला देखील  दाखल होण्याची शक्यता आहे.

काय सांगतो नियम? 

शेवटच्या 48 तासात ज्यावेळी कोड ऑफ कंडक्ट लागतो म्हणजे ज्या वेळी प्रचार संपतो आणि प्रत्यक्षात मतदान संपल्यानंतर एक तासाचा जो काळ असतो त्या काळात कोणीही प्रचार करायचा नसतो. प्रतिक्रिया जरी दिली तरी त्यामध्ये मतदारांना मतदानाला येण्याचे आवाहन करता येते. मात्र थेट  कोणत्या पक्षावर, व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचे आरोप करता येत नाही.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा जागांवर मतदान पार पडले. काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या तर काही ठिकाणी संथगतीने मतदान सुरू असल्याच्या तक्रारी येत होत्या. याच पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच त्यांनी भाजपालाही लक्ष्य केले. उद्धव ठाकरे यांच्या याच पत्रकार परिषदेवर आक्षेप घेऊन भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली.

उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश

आशिष शेलार यांच्या तक्रारीची दखल घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. आचारसंहिता भंग झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर ठाकरे यांच्यावर फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो.

error: Content is protected !!