हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात आरोपीविरुद्ध गुन्हा सिध्द, गुरुवारी निकाल येण्याची शक्यता
हिंगणघाट, दशरथ ढोकपांडे – प्रा. अंकिता जळीतकांड प्रकरणात आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे याला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने खुनाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवले आहे. गुरुवारी ता.१० या प्रकरणात शिक्षेवरुन सुनावणी होणार आहे. या प्रकरणाचा गुरवारी निकाल येण्याची शक्यता आहे.
सकाळी ११ वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल भागवत यांच्या समोर सुनावणीला सुरवात झाली. ११.30 वाजताच्या दरम्यान त्यांनी आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे याला खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवीले. सरकारी वकील ॲड उज्वल निकम यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा सिद्ध झाला असल्यास शिक्षेकरिता आरोपीला त्याचे मत मांडण्याकरिता तसेच युक्तिवाद करण्याकरिता आणि सरकारी पक्षाला कोणती शिक्षा मागावी याकरिता वेळ मिळावा म्हणून वेळ देण्यात यावी,अशी विनंती केली. न्यायालयाने शिक्षेवरुन आरोपी आणि सरकारी पक्षाला युक्तिवाद करण्याकरिता गुरवारची १०फेब्रुवारी तारीख दिली. दरम्यान आरोपीला न्यायालयने दोषी ठरविल्यानंतर विशेष सरकारी वकील ॲड उज्वल निकम यांनी न्यायालाया बाहेर आल्यावर आपण शिक्षेकरिता न्यायालयात तक्ता जाहीर करू, असे पत्रकारांशी बोलतांना सांगितले. न्यायालयाचा जो निकाल येईल तो आपल्याला मान्य राहील,असेही ते म्हणाले. बचाव पक्षाचे वकील अड भूपेंद्र सोने यांनी माझे अभियुक्त निर्दोष असून माझ्या सोबत अन्याय झालेला आहे. मी उद्या कोणताही युक्तिवाद करणार नाही. न्यायालयाचा जो निर्णय देईल त्याविरुद्ध आपण उच्च न्यायालयात दाद मागणार आहो, असे सांगितले. प्रा.अंकिता कॉलेजमध्ये जात असताना आरोपीने पाठीमागून येऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळले. उपचारादरम्यान नागपूर येथील हॉस्पिटल येथे तिचा मृत्यू झाला. या बहुचर्चित प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाबाहेर मोठी गर्दी जमली होती. प्रा.अंकिता हिची आई संगीता आणि वडील अरुणराव पिसुडे हे आज न्यायालयात उपस्थित होते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर ,उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, ठाणेदार संपत चव्हाण, या प्रकरणाचे तपास अधिकारी सोमनाथ टापरे उपस्थित होते