केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी, खंडणीची मागणी?

0 124

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नावाने धमकीचे फोन आले. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या नागपुरातल्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. (Union Minister Nitin Gadkari Death Threat Over 3 Phone Calls Under The Name Of Don Dawood)

 

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये हे फोन आले आहेत. शनिवारी सकाळपासून एकूण तीन फोन आले आहेत. विशेष म्हणजे हे तिन्ही फोन उचलल्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे नाव घेण्यात आले आहे. त्यामुळे आता नागपूर कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन गडकरी यांचे खामल्यात जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात आज (शनिवार) सकाळी साडेअकरा वाजता फोन आला. फोनवरून बोलणा-या व्यक्तीने दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचे सांगून नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि काही सेकंदातच त्याने फोन कट केला. फोन घेणाऱ्याने लगचे भारतीय जनता पक्षातील वरिष्ठांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनाही माहिती देण्यात आली. अर्ध्यातासातच गडकरी यांच्या संपर्क कार्यालयास पोलिसांनी वेढा घातला. तसेच दहशतवाद विरोधी पथक आणि नक्षलवाद विरोधी अभियानाचे पथकासह अन्य यंत्रणा सतर्क झाली.

 

 

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गडकरी यांचे वर्धा रोडवरील घर आणि खामल्यातील जनसंपर्क कार्यालयासमोर मोठा ताफा तैनात केला आहे. शस्त्रधारी पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली असून घराकडे आणि जनसंपर्क कार्यालयाकडे जाणारे रस्ते तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहे. नागपूर पोलिसांची बॉम्ब शोधक-नाशक पथक आणि श्वानपथकहा सज्ज ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी परिसरातही बंदोबस्त वाढवला आहे.

error: Content is protected !!