उपमुख्यमंत्री अजित पवार नॉट रिचेबल….पक्षाकडून आली महत्वाची माहीती

0 348

: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकारणाची राज्यभर चर्चा असते. अचानक नॉट रिचेबल झाल्यामुळेही अजित पवार चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांत प्रचारादरम्यान, काही उमेदवारांना थेट धमक्या दिल्याने ते टीकेचे धनी बनले होते. मात्र, गेल्या 2 दिवसांपासून अजित पवार निवडणूक प्रचारातही सहभागी नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीतील महायुतीच्या सभेला ते उपस्थित न राहिल्यानं त्यांच्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतून महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत निवडणूक अर्ज भरला तेव्हाही अजित पवार गैरहजर होते. यावेळी, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल वाराणसीत पोहोचले होते. त्यामुळे, अजित पवार नेमकं कुठं गायब झाले आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यावर, अजित पवारांची तब्बेत बरी नसल्यानं गैरहजर राहिल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात येत आहे. मात्र, अजित पवार महायुतीत नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

काय म्हणाले उमेश पाटील?

“अजित पवार नॉटरिचेबल असले की ते नाराज आहेत, अशा बातम्या माध्यमांमध्ये दाखवल्या जातात. पण ते नॉटरिचेबलही नाही आणि नाराजही नाहीत. अजित पवार यांना निवडणुकीच्या कार्यकाळात घशाचे इन्फेक्शन झाले होते, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काळजी घ्यायला सांगितली आहे. मात्र ते उद्यापासून पुन्हा प्रचारात सहभागी होतील”, अशी प्रतिक्रिया उमेश पाटील यांनी दिली.

काँग्रेसच्या आरोपालाही दिलं प्रत्युत्तर

अजित पवार यांना जाणीवपूर्वक प्रचारापासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. या आरोपालाही उमेश पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. “काँग्रेसने केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहे. यात काहीही तथ्य नाही. अजित पवार यांचे कार्यकर्ते महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये, वॉर्डात, तालुका, जिल्ह्यात आहेत. मतदारांचा मोठा वर्ग त्यांच्या पाठिशी आहे. पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या नेत्याला प्रचारापासून बाजुला ठेवून कोण स्वतः चे नुकसान करुन घेईल का?” असे उमेश पाटील म्हणाले.

error: Content is protected !!