श्री शिवाजी महाविद्यालयात दुर्लक्षित रानभाज्यांचे प्रदर्शन

0 84

 

परभणी,दि 27 ः
येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी दुर्लक्षित आणि लोप पावत चाललेल्या रानभाज्या तसेच वनौषधी ओळख प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख सदस्य हेमंतराव जामकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.अंबादास कदम, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्या डॉ.विजया नांदापुरकर, विभागप्रमुख डॉ. एस.व्ही. सय्यद, डॉ.जयंत बोबडे, रामभाऊ रेंगे आदींची उपस्थिती होती.
सदरील प्रदर्शनात करटुला, घोळ, चिवळ, सुरण, आघाडा, कपाळ फोडी, पानओवा, अनंतमूळ, कुरडू, पाथरी, खापरखुटी, मटारु, आंबुशी, कडुभाजी, तांदुळजा आदींसह एकूण ६१ रानभाज्या तसेच वनौषधींची माहिती सोबत प्रत्यक्ष भाज्या-वनौषधी ही विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे यातील अर्ध्याहून अधिक भाज्या आणि वनौषधी महाविद्यालयाच्या बोटॅनिकल गार्डन मध्ये आहेत. प्रदर्शनात प्रत्येक भाजी-वनौषधीची इतंभूत माहीत सांगण्यात येत होती.
उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.अंबादास कदम म्हणाले, रानभाज्यांचे आपल्या दैनंदिन जीवनात वापर करायला हवा. रानभाज्यांमध्ये शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक सामाविष्ट असतात. परंतु आपल्याला या रानभाज्यांची माहिती नसल्यामुळे दुर्लक्षीत आहेत. या रानभाज्यांची नोंद व संशोधन हे भारताबाहेरील अमेरिका, कॅनडा सारखे देश करीत आहेत असेही ते म्हणाले. प्राचार्य डॉ.जाधव म्हणाले, विद्यार्थ्यांनी रानभाज्यांची माहिती व अभ्यास करून आपल्या निरोगी आयुष्याकडे वाटचाल करावी. काही वर्षांपूर्वी रानभाज्यांच्या वापरामुळे माणसाचे आरोग्य निरोगी होते असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. व्ही. सय्यद, सूत्रसंचालन प्रा.बालाजी दूधाटे तर आभार प्रा.आर.ए.जोशी यांनी मानले. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी डॉ. एम. डी. सोनुले, प्रा. एस. एम. देशमुख, प्रा. पी. व्ही. आरमळ, हरिदास पोलावार, उमाजी लांडगे, नितीन पवार आदींनी पुढाकार घेतला.

error: Content is protected !!