खडकवासला येथील केंद्रीय विद्यालयाच्या निवृत्त प्राचार्यासह चौघांवर गुन्हा दाखल; अॅडमिशन देण्याच्या नावाखाली उकळले 17 लाख
खडकवासला, प्रतिनिधी – खडकवासला येथील डि आय टी गिरीनगर येथील केंद्रीय विद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून तब्बल १७ लाख ६० रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी निवृत्त प्राचार्य व त्यांच्या मुलासह चौघांवर हवेली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.प्रदीप सद्य सांगोले आणि त्यांचा मुलगा शुभम प्रदीप सांगोले (रा. गजानन कॉलनी, गोंदिया), अनंता मधुकर लायगुडे (रा. गोर्हे खुर्द, ता. हवेली) आणि विठ्ठल श्रीरंग थोपटे (रा. खानापूर, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी निलेश रमेश राऊत (वय ४१, रा. गोर्हे बुद्रुक, ता. हवेली) यांनी हवेली पोलीस ठाण्यात ( गु. र. नं. २३४/२१) फिर्याद दिली आहे.
निलेश राऊत हे लष्करातून सेवा निवृत्त झाले असून सध्या गोर्हे बुद्रुक येथे व्यवसाय करतात. तर प्रदीप सांगोले हे गिरीनगर येथील केंद्रीय विद्यालयात प्राचार्य होते. प्राचार्य व त्यांचा मुलगा शुभम यांनी अनंता लायगुडे व विठ्ठल थोपटे यांच्या मदतीने मुलांना केंद्रीय विद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे सांगून लोकांकडून पैसे उकळले.
निलेश राऊत यांच्या मुलाला प्रवेश मिळवून देण्यासाठी २० एप्रिल २०२१ रोजी ९० हजार रुपये घेतले. याशिवाय इतरांकडून एकूण १७ लाख ६० हजार रुपये घेतले.
हे पैसे घेतल्यानंतर प्रदीप सांगोले हे सेवानिवृत्त झाले. त्यांनी मुलांचे अॅडमिशन करुन दिले नाही. फिर्यादी व इतरांनी पैसे परत मागितल्यावर पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली. पैसे परत देत नसल्याचे आता लोकांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे अधिक तपास करीत आहेत.