माघी गणेश जयंती
माघी गणेश जयंती
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ ।
निर्विघ्नं कुरूमे देव सर्व कार्येशु सर्वदा ।।
गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते.
‘चौदा विद्या चौसष्ठ कलां’चा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील जयंती उत्सव २५ जानेवारी बुधवार रोजी सर्वत्र साजरा होत आहे.
ॐ एकदन्ताय विद्महे।
वक्रतुण्डाय धीमहि।
तन्नो दन्ती: प्रचोदयात|
या आठव्या मंत्राला ‘गणेश गायत्री’ म्हणतात. (प्रत्येकी आठ अक्षरे असणाऱ्या तीन चरणांच्या वेदातील रचनेला गायत्री म्हणतात.)
गणेश जयंती (शब्दशः “गणेशाचा वाढदिवस”), ज्याला माघ शुक्ल चतुर्थी, तिलकुंड चतुर्थी आणि वरद चतुर्थी असेही म्हणतात. गणेशाच्या या सणाला उत्तर प्रदेशात तिलो चौथ किंवा सकट चौथी असेही म्हणतात.
हिंदू धर्मग्रंथानुसार माता पार्वतीने श्री गणेशाची निर्मिती अंगाच्या मळापासून केली होती. त्या दिवशी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी होती. जो कोणी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची आराधना करतो त्याला दैवी सुख प्राप्त होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.
गणपती, गणेशाच्या केवळ नामोच्चाराने चैतन्य, उत्साह आणि सकारात्मकतेचा संचार मनात, शरीरात आणि वातावरणात नेहमीच होतो. बुद्धिदाता, गणांचा अधिपती, सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता, संकटनाशक अशा कितीतरी बिरुदांनी प्रसिद्ध असलेल्या गणेशाची घरोघरी उपासना, नामस्मरण, पूजन केले जाते. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणपतीचे पूजन केले जाते. यापैकी वद्य पक्षातील संकष्ट चतुर्थी अधिक महत्त्वाची मानली जाते. तर शुद्ध पक्षातील चतुर्थींमध्ये श्रीगणेश चतुर्थी आणि श्रीगणेश जयंती या दोन तिथी सर्वोच्च मानल्या गेल्या आहेत.
गणेश जयंती हा एक लोकप्रिय सण आहे. विशेषतः भारताच्या महाराष्ट्र राज्यात आणि गोव्यातही माघ महिन्यात शुक्ल पक्ष चतुर्थीच्या दिवशी (उज्ज्वल पंधरवड्याचा चौथा दिवस किंवा मेणाचा चंद्र) पंचांगानुसार साजरा केला जातो.
महादेव आणि देवी पार्वतीचे पुत्र गणपती प्रथम पूजनीय मानले गेले आहे म्हणून कोणत्याही शुभ कार्य सुरू करण्याआधी गणपतीची आराधना केली जाते. गणपती हा दिशांचा अधिपति आहे. गणेशपूजन केल्यामुळे दिशा मोकळया करतो. त्यामुळे ज्या देवतेची आपण पूजा करीत असतो, ती पूजास्थानी येऊ शकते. गणपति (नाद) भाषेचे देवांच्या (प्रकाश) भाषेत रूपांतर करतो, त्यामुळे मनुष्याच्या प्रार्थना देवांना कळतात. गणपति विघ्नहर्ता आहे. उंदीर हे गणपतीचे नित्याचे वाहन आहे.
भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी अर्थात गणेशोत्सव जेवढ्या मोठ्या सार्वजनिक आणि घरगुती स्वरूपात साजरा केला जातो, त्या तुलनेत माघी गणेशोत्सव भव्य नसतो. काही जण घरीच गणपतीची मूर्ती आणून पूजा करतात. तसेच काही ठिकाणी तो सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो.
गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला, असे म्हटले जाते. पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा, त्याला पुष्टिपती विनायक जयंती म्हणतात. या दिवशी पिठाचा गणपती करून त्याचे पूजन केले जाते. दुसरी वेळ म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेशचतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते. हे पूजन म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची पूजा असते. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. त्याप्रती कृतज्ञता म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते, तर तिसरा दिवस (वेळ) म्हणजे माघ शुक्ल जयंती. या दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितले आहे. त्याबाबत, स्कंद पुराणात एक कथा आहे. या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारले. त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला. म्हणून, ही माघी गणेश जयंती (माघी गणेशोत्सव) म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. या दिवशी उपवास करून धुंडीराज गणेशाला तीळ व साखरेचे मोदक करून अर्पण करायचे असतात. एक वेळ उपाशी राहून या दिवशी जागरण करायचे असते.
माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. भाद्रपद महीन्यातील चतुर्थी प्रमाणेच माघ महीन्यातील चतुर्थीला पण तेवढेच महत्त्व आहे. या गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी असेही म्हटले जाते.
भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवैद्य दाखविला जातो. तर माघी गणेशोत्सवात गणपतीला तीळाच्या लाडवांचा नैवैद्य दाखविण्याची प्रथा आहे.
यानिमित्ताने गणपती बाप्पाचे मंत्र, श्लोक, स्तोत्रे, अथर्वशीर्ष यांचे पठण केले जाते. गणपती अथर्वशीर्षाप्रमाणे गणेश चालीसाला तितकेच महत्त्व असल्याचे सांगितले जाते.
या दिवशी गणेश भक्त… आपल्या परिसरात गणपती मंदिर असेल आणि तिथे दर्शनासाठी जाणे शक्य असेल तर मंदिरात जाऊन देवदर्शन करतात.
भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाप्रमाणे अलिकडच्या काही वर्षांमध्ये माघी गणेशोत्सवही उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे. आधी मंदिरांपुरता मर्यादीत असलेला माघी गणेशोत्सव आता सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर साजरा होऊ लागला आहे. ठाणे शहरातील नौपाडा भागात १९३१ मध्ये पहिल्यांदा सार्वजनिक माघी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आता महाराष्ट्रात १०० पेक्षा जास्त सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून माघी गणेशोत्सव साजरा केला जातो.
श्री गणेशाची कृपा,
आपणांवर सदैव राहो..
प्रत्येक कामात यश मिळो ,
जीवनात कधीही दुःख न येवो,
गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
ज्योती कुलकर्णी, मुंबई
लेखिका, स्पेशल एजुकेटर व समाजसेविका