किती खाणार..लाचखोर कृषि पर्यवेक्षक मोहन देशमुख अडकला जाळ्यात
परभणी,दि 12 ः
गंगाखेड येथील तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील मोहन सुरेशराव देशमुख (वय 48) या कृषि पर्यवेक्षकास (वर्ग-3) मंगळवारी (दि.12) तीन हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने ताब्यात घेतले.
येथील लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या कार्यालयात एका व्यक्तीने तक्रार दाखल केली. त्याद्वारे त्यांचे पुतणे यांची राज्य कृषि यांत्रिकीकरण योजने अंतर्गत रोटाव्हेटरसाठी ऑनलाईन सोडतमध्ये निवड झाली. रोटाव्हेटर खरेदीसाठी पूर्व संमती पत्र गंगाखेडच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाले. पाठोपाठ पुतण्याने रोटाव्हेटर खरेदीही केले. त्याची पाहणी करुन त्याचे फोटो वेबसाईटवर अपलोड करण्याकरीता कृषि खात्याचे पर्यवेक्षक मोहन देशमुख यांनी 21 फेबु्रवारी रोजी गावी भेट देवून खरेदी केलेल्या रोटाव्हेटरचे फोटो काढले व तक्रारकर्त्यास मी तुमचे मोठे काम केले आहे, यापूर्वीही तुमच्या भावाला अनुदानावर मिळालेल्या ट्रॅक्टरचे फोटे काढून वेबसाईटवर अपलोड केले आहेत. तेव्हा तुम्ही मला येवून भेटतो असे म्हणाला होतात, परंतु तुम्ही भेटला नाहीत, असे नमूद करीत ट्रॅक्टर व रोटाव्हेटरचे फोटो वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी आणि अनुदानाची रक्कम बँक खात्यावर टाकण्यासाठी लाचेची मागणी केली, असे या तक्रारकर्त्याने नमूद केले.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागच्या अधिकार्यांनी या तक्रारीच्या आधारे 5 मार्च रोजी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. पडताळणी दरम्यान, मोहन देशमुख यांनी तक्रारकर्त्याकडे 3 हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्या आधारे 12 मार्च रोजी या खात्याच्या पथकाने मोहन देशमुख यांना 3 हजार रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले.
या खात्याचे पोलिस अधिक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी उपअधिक्षक अशोक इप्पर, पोलिस निरीक्षक सदानंद वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली निलपत्रेवार, नागरगोजे, जिब्राहिल शेख, बेंद्रे, कदम, नरवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, संबंधित कृषि पर्यवेक्षकाविरुध्द गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.