यापुढे मी भुजबळांच्या कोणत्याही मंचावर जाणार नाही : विजय वडेट्टीवार

0 62

ओबीसींच्या हक्काची भूमिका मांडत असताना मराठा-ओबीसी बांधवांमध्ये दरी पडणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. मात्र छगन भुजबळ अतिशय टोकाची भूमिका मांडत आहेत. विष पेरणं सोपं आहे. मात्र ते जर प्राशन करून कुणाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण? भुजबळांच्या टोकाच्या भूमिकांना समर्थन देण्याचं काही कारण नाही, अशी रोखठोक भूमिका घेत इथून पुढे भुजबळांच्या कोणत्याही मंचावर जाणार नाही, असे काँग्रेस नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
जालन्याच्या अंबडमध्ये ओबीसी नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार भाषण करताना सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध करताना मनोज जरांगे यांच्यावरही जोरदार टीका केली. मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं पण ओबीसीला धक्का न लागता ते आरक्षण द्यावं, असं सरकारला आवाहन करताना सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे यांचा भुजबळांनी यथेच्छ समाचार घेतला. एवढे मराठे नेते असतानाही, तुम्ही माझ्यावरच टीका का करता? असा सवाल त्यांनी विचारला होता. यावेळी भुजबळांनी लाखभर लोकांसमोर जुन्या अंदाजात भाषण ठोकून जरांगेंविरोधात तलवार उपसून ओबीसींच्या हक्कासाठी मी शेवटपर्यंत लढेन, असा शब्द दिला. त्यांच्या याच भाषणावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नाराजी दर्शवली.

वडेट्टीवार म्हणाले, छगन भुजबळ टोकाची भूमिका घेत आहेत ते पाहता त्यामुळे मी यापुढे भुजबळांच्या कोणत्याही मंचावर जाणार नाही. भुजबळांना विरोध किंवा समर्थनाचा प्रश्न नाही, त्यांनी टोकाची भूमिका घेतल्याने विरोध आहे. भुजबळांच्या भूमिकेमुळे समाजात तेढ वाढत आहे. त्याला आमचा विरोध आहे. महत्वाचं म्हणजे भुजबळांचं मत म्हणजे समाजाची भूमिका होत नाही. आपला हक्क मांडत असताना दोन समाजात तेढ निर्माण होईल याला माझा पाठिंबा नाही. समाजात दोन गट पडतील तर याला आमचा विरोध आहे, त्या भूमिकेला आमचं समर्थन नाही  भूमिका मांडताना  टोकाची भूमिका असू शकत नाही. समाजाच्या समस्या सोडवायच्या आहे.  गावागावात भांडण झाली तर त्याला कोण जबाबदार राहणार आहे.  सत्तेत असलेल्या माणसाने समस्या सोडवायच्या असतात मांडायच्या नसतात.

मी कोणतीही टोकाची भूमिका घेतली नाही : भुजबळ

वडेट्टीवारांच्या वक्तव्यानंतर भुजबळ म्हणाले, वडेट्टीवार यांच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, ते काय बोलले हे जाणून घेत आहे.
माझ्या कोणत्या भूमिकेला त्यांचा विरोध आहे ते कळले नाही. एकटा तर एकटा लढा सुरू राहील, शेंडगेसारखे अनेक नेते माझ्या सोबत आहेत त्यांना घेऊन लढा सुरू राहणार आहे. ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण  देऊ नका ही भूमिका वडेट्टीवार यांची  होती. जे कुणबी आहेत त्यांबद्दल माझे काहीच म्हणणे नाही. मी कोणतीही टोकाची भूमिका घेतली नाही.

error: Content is protected !!