‘त्यांना ‘ पुनर्वसनासाठी मदत करूया ..

0 299

 

गेल्या वर्षी परभणी जिल्ह्यात मी ‘ जिल्हा महिला व बालविकास अधिकारी’ या पदावर रुजू झालो.परभणी जिल्ह्याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आले की येथे वारांगनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.येथे NACO(National Aids Control Organisation)ने नोंदणीकृत केलेल्या जवळपास 1000 महिला आहेत. परभणी शहराच्या एका भागात यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे तसेच ग्रामीण भागातही त्यांचे वास्तव्य आहे.सर्वप्रथम सदरील महिलांना ‘सेतू’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून भेटलो .तेव्हा त्यांच्या जगण्यातील अडचणींची दाहकता लक्षात आली.

 

इतरांप्रमाणेच माझेही त्यांच्याबाबतीत गैरसमज होते .विशेष करून आर्थिक परिस्थिती बाबत ! माझा असा समज होता की त्या बऱ्यापैकी सधन असतात,त्यांना पैशाची कमी नसते.. पण प्रत्यक्षात जेंव्हा त्यांना भेटलो, त्यांची वस्ती पहिली,परिस्थिती पहिली आणि मग कळलं की त्यांना जगण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागतो. त्यांना प्राप्त होणारा पैसा हा त्यांच्याकडून व्यवसाय करून घेणाऱ्या ‘मावशीच्या’ हातात असतो,ज्या कुणी स्वतंत्र हा व्यवसाय करतात त्यांचे 60% उत्पन्न हे भाडे देण्यात जाते कारण यांच्याकडून इतरांच्या तुलनेत दुप्पट भाडे घेतले जाते.20 रु त त्यांच्या शरीराचे लचके तोडले जातात ,बऱ्याच वेळी तर पैसेही न देता गिऱ्हाईक निघून जातो,वरून व्यसनाधीन लोकांकडून होणारा त्रास वेगळाच!.

यांचं शारीरिक शोषण तर होतच वरून सामाजिक अवहेलना तर पाचवीला पुजलेली ..! तारुण्य आहे तोपर्यंत व्यवसायाची गरज आहे म्हणून तरुण महिलेच्या गरजा ‘मावशीकडुन’ भागविल्या जातात पण बालके आणि वृद्ध महिलांचे खूप हाल होतात ..!बालकांना त्यांचा बाप माहीत नसतो आणि आईजवळही हक्काने राहता येत नाही अशा परिस्थितीत ते व्यसनाकडे वळतात..!

shabdraj add offer

सदरील महिलांचा ‘माणूस’ या प्रजातीवरच विश्वास नसतो तेथे शासकीय यंत्रणेवर विश्वास ठेवणे अश्यकच ! तथापि मी 3 ते 4 वेळा त्यांच्याशी बैठक घेतली.त्यात त्यांचे मूलभूत प्रश्न जाणून घेतले. त्यातील बऱ्याच महिलांना तोंडावर म्हणताना ऐकलं,”हे बी सायेब तसच असलं माय,सरकार च काय खर नसते, उग बोलीवतेत,भाषण करतेत आन देत काहीच नाहीत..”त्यांच्या स्पष्ट बोलण्याच कौतूक वाटलं पण माझ्या पुढ्यात काय मांडून ठेवलंय हे मला लक्षात आले.मी त्यांना विचारलं तुम्हाला काय पाहिजे तेंव्हा एका क्षणाचा विलंब न करता सर्व एकमुखाने म्हणाल्या “राशन द्या राशन ” सर्वप्रथम त्यांना राशन मिळालं पाहिजे हे मला कळलं .स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून किती जणांना राशन कार्ड नाही व किती जणांना राशन मिळत नाही याची माहिती घेलती व एका महिन्यात आदरणीय जिल्हाधिकारी आंचल सूद गोयल मॅडम,जिल्हा पुरवठा अधिकारी मुथा मॅडम यांच्या साहाय्याने सर्वांना राशन कार्ड व राशन सुरू केले.या एका कृतीमुळे त्यांचा विश्वास बसला आणि मग त्या मला मनातील बोलू लागल्या अगदी मी त्यांचा घरातील सदस्य असल्या सारखा…!त्यानंतर 2 ,3 बैठकांमध्ये त्यांच्या आरोग्याबद्दल चर्चा झाली डॉ.सुरवसे साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले..हे करत असताना मी त्यांना नेहमी सांगत होतो की तुम्ही ह्या क्षेत्रातून बाहेर पडायला हवे आणि सन्मानाने जगायला हवे …किमान त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी तरी…!.

 

सुरुवातीला मला प्रतिसाद मिळाला नाही पण 5/6 बैठकानंतर त्यातील काही महिला पुनर्वसनासाठी तयार झाल्या.मला प्रचंड आनंद झाला मी लगेच जिल्ह्यातील डॉक्टर,उद्योगपती यांची माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेलती आणि सदरील महिलांना काम देण्याची विनंती केली .त्यात एका उद्योगपतीने त्याच बैठकीत सांगितले की 30 महिलांना ते एक महिन्यात काम देऊ शकतात ..मी खुश होऊन जेंव्हा त्यांची बैठक घेतली तेंव्हा 30 जणांची यादी तयार केली. मी पुन्हा त्या उद्योगपती ला त्या संदर्भात सम्पर्क केला तर त्यांनी दसरा,दिवाळी , काही दिवस असे करत आता दिलेला शब्द फिरवला आहे.काही डॉक्टर यांच्याशी संपर्क करून पाहिला,इतर उद्योगपती यांच्याशी बोललो पण आज पर्यंत मला त्यात यश आले नाही.कुठे तरी आशेचा किरण जन्माला यायला लागला होता पण…..

 

केवळ शासकीय यंत्रणेद्वारे यांचे पुनर्वसन होऊ शकत नाही समाजासही यात सहभागी व्हावे लागेल.कृपया आपल्याकडे काही काम असल्यास कळवावे .त्यांना कामाचा माफक मोबदला पाहिजे. त्यांना त्यांच्या मुलांची काळजी आहे,आपण ज्या नरकात आहोत त्या नरकात त्यांना मुलांना ढकलायचे नाही आणि त्यासाठी ते कितीही श्रम घ्यायला तयार आहेत .एखादी स्वयंसेवी संस्था,औद्योगिक समूह, उद्योगपती,डॉक्टर्स, विविध संस्थाचालक ,विविध व्यावसायिक,सामाजिक कार्यकर्ते, सहृदयी नागरिक यांना याद्वारे मी आवाहन करतो की आपण पुढाकार घ्यावा व सदरील महिलांना सन्मानाने जगण्यासाठी मदत करावी ..

 

सद्यस्थितीत 300 महिला पुनर्वसनासाठी तयार आहेत .
1) यात 18 ते 60 वर्षातील महिला आहेत.
2)निरक्षर ते 12 नापास पर्यंत शिक्षण आहे, पुढे शिक्षण घेण्याची तयारी आहे
3)त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी किमान 6000 महिना आवश्यक आहे .
4)त्या प्रशिक्षण घ्यायला तयार आहेत.प्रशिक्षण परभणी किंवा परभणी बाहेर ही घेऊ शकतील
5)परभणी मध्ये काम असेल तर उत्तमच पण परभणी बाहेर सुद्धा कामास त्यांची तयारी आहे.
आपणास मदत करण्याची ईच्छा असल्यास किंवा एखाद्या मदत करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांची माहिती असल्यास कृपया माझ्या 9975452566 या क्रमांकावर संपर्क साधावा ही नम्र विनंती..🙏🏻🙏🏻
महत्प्रयासाने त्यांनी ‘ माणुसकी’ या शब्दावर विश्वास ठेवला आहे,चला आपण सर्व मिळून त्यांचा विश्वास सार्थ ठरवुया !
“मस्जिद है बहोत दूर../
चलो किसी रोते बच्चे को हसाया जाये…//”

आपलाच नम्र
कैलास तिडके
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,परभणी
मो.क्र.9975452566

error: Content is protected !!