प्रा. संध्या रंगारी यांची ‘मुकी ओवी’ कथा भोपाळ विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात तर औरंगाबाद विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात कवितांचा समावेश

0 73

आखाडा बाळापुर, प्रतिनिधी – मराठीतील प्रख्यात कवयित्री तथा ललित लेखिका प्रा. संध्या रंगारी यांच्या ‘ मुकी ओवी ‘ या कथेचा समावेश भोपाळ विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात कवितांचा समावेश करण्यात आला आहे .पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात एकाच वर्षी दोन विद्यापीठात कथा, कविता समाविष्ट झाल्याने त्यांच्या साहित्याचा दर्जा अधोरेखित झाला आहे.

 

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार मराठी विषयाचा बी.ए.द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम आज हायर एज्युकेशन मध्य प्रदेश सरकारच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात बी. ए. द्वितीय वर्षाच्या राष्ट्रीय अभ्यासक्रमात ‘ मराठी कथा साहित्याचा अभ्यास ‘ या पेपरसाठी प्रा. संध्या रंगारी यांच्या कथेची निवड करण्यात आली आहे . स्त्रीवादी कथा साहित्यात नारायणराव वाघमारे महाविद्यालय, आखाडा बाळापुर जि. हिंगोली येथे कार्यरत प्राध्यापिका तथा मराठी साहित्यातील आघाडीच्या कवयित्री, कथाकार प्रा. संध्या रंगारी यांच्या कथेचा समावेश करण्यात आला आहे.त्यांच्या ‘ चांदणचुरा ‘ या संग्रहातील ‘ मुकी ओवी ‘ या ललित कथेचा समावेश करण्यात आला आहे.स्त्री वादी लेखिका सानिया आणि प्रा. संध्या रंगारी या दोनच स्त्री वादी लेखिकांच्या साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद च्या एम. ए. हिन्दी प्रथम वर्ष या पदव्युत्तर अभ्यासक्रमात दोन कवितांचा समावेश करण्यात आला आहे. ‘ समकालीन मराठी अनुदित कविता ‘ या पाठ्यपुस्तकात दोन अनुवादित कविता समाविष्ट करण्यात आल्या आहेत. एकाच वर्षात दोन विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात कथा, कवितांचा समावेश झाल्याने त्यांच्या साहित्याचा दर्जा अधोरेखित झाला आहे.

 

यापुर्वीही त्यांच्या कथा, कविता मुंबई विद्यापीठ, मुंबई , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे , स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड , महात्मा गांधी विद्यापीठ, केरळ, महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ बडोदा, गुजरात , डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहेत. आता पुन्हा नव्याने दोन विद्यापीठात मराठी , हिंदी या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्यांच्या कथा , कवितांचा समावेश झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. कृष्णराव पाटील जरोडेकर, प्राचार्य डॉ. दिगंबर मोरे व महाविद्यालयाच्या प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!