‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत पहा कृषि विभागाच्या विविध योजना
राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असून त्यासाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी करता येणार आहे.
कृषि यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. कृषि विभागाने अशा योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबीच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेतीशी निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांतर्गत यांत्रिकीकरणाच्या अनेक बाबींकरिता अर्थसहाय्य करण्यात येते. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना एका अर्जाद्वारे सर्व योजनांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांसाठी यांत्रिकीकरण घटकामध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्र व अवजारे, ट्रॅक्टर, पॉवर टिलर चलित अवजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैल चलित अवजारे, प्रक्रिया युनिटस्, भाडे तत्त्वावर कृषि व अवजारे सेवा पुरवठा केंद्राची उभारणी व अवजारे बँक इत्यादींचा समावेश केला आहे.
यंत्रसामुग्रीसाठी अर्थसहाय्य
ट्रॅक्टर (८ पेक्षा जास्त ते ७० पीटीओ एच.पी.), पॉवर टिलर (८ पेक्षा जास्त), स्वयंचलित यंत्रे, ट्रॅक्टर/पॉवर टिलर चलित अवजारे अंतर्गत जमीन सुधारणा व पूर्वमशागतीसाठीची अवजारे, पेरणी, पुनर्लागवड व काढणीसाठीची अवजारे, आंतर मशागतीसाठीची अवजारे, पिकांचे अवशेष व्यवस्थापन किंवा गवत आणि चारा उपकरणे, काढणी व मळणीसाठीची यंत्र आणि अवजारे, पेरणी, पुनर्लागवड, आंतरमशागत, काढणी व मळणीसाठी सर्व प्रकारची मनुष्य, बैलचलित यंत्र आणि अवजारे, पीक संरक्षण उपकरणे इत्यादी यंत्र अवजारे खरेदी करण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प, अत्यल्प भूधारक व महिला शेतकऱ्यांसाठी ५० टक्के व इतरांसाठी ४० टक्के अर्थसहाय्य/अनुदान दिले जाते.
अन्नधान्य, तेलबिया आणि फळपिकांसाठी काढणी पश्चात प्रक्रिया उपकरणासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प, अत्यल्प भूधारक व महिला शेतकऱ्यांसाठी ६० टक्के व इतरांसाठी ५० टक्के अर्थसहाय्य/अनुदान दिले जाते.
कृषि अवजारे बँक
राज्यात पीक रचनेनुसार पिकाच्या पेरणीपासून काढणीपासून प्राथमिक प्रक्रियेपर्यंत शेतकऱ्यांना माफक दराने यांत्रिकीकरणाची सेवा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यासाठी अद्ययावत यंत्रसामुग्री असलेली कृषि अवजारे बँक स्थापन करण्यास अर्थसहाय्य करण्यात येते. कृषि अवजारे बँक स्थापन करण्यासाठी कृषि अवजारे खरेदीसाठी भांडवली खर्चाच्या ४० टक्के इतकी अनुदान मर्यादा असून कृषि अवजारांवरील १० लाख, २५ लाख, ४० लाख, व ६० लाख भांडवली गुंतवणुकीच्या अवजारे बँकेस अनुक्रमे ४ लाख, १० लाख, १६ लाख व २४ लाख रुपये इतके अनुदान अनुज्ञेय आहे.
अनुदान अदा करण्याची कार्यपद्धती
जिल्ह्यास प्राप्त लक्ष्यांकानुरूप लाभार्थीची निवड महाडीबीटी पोर्टलवर संगणकीय सोडत पद्धतीने केली जाते. लाभार्थी म्हणून निवड झाल्यांनंतर विहित कालावधीत आवश्यक कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती सादर करावयास लागतात. अवजारे खरेदीकरिता पूर्वसंमती मिळाल्यानंतर एक महिन्याच्या आत देयक सादर करणे आवश्यक आहे. औजारे खरेदीकरिता पूर्वसंमती मिळाल्यानंतर अवजारे यंत्राची खुल्या बाजारातून खरेदी करताना स्वतःच्या बँक खात्यातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, धनादेश किंवा धनाकर्षाद्वारे विक्रेत्यास रक्कम अदा करणे बंधनकारक आहे.
पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर लाभार्थींनी अवजारांची खुल्या बाजारातून सुरुवातीस संपूर्ण रक्कम भरून स्वतः खरेदी करावी. अशा प्रकरणी अवजारांच्या गुणवत्तेबाबत व दर्जाबाबत सर्वस्वी जबाबदारी संबंधित लाभार्थी संस्था व गटाची राहील.
अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि सहायक यांच्याशी संपर्क करावा.
संकलन – जिल्हा माहिती कार्यालय, सातारा