समाजसेवक ‘हर्षद ढगे’, ‘फॉर फ्यूचर इंडिया’ मार्फत करतोय पर्यावरणाचं रक्षण

0 15

सागरदूत म्हणून नावारूपाला आलेला हर्षद ढगे त्याच्या ‘फॉर फ्यूचर इंडिया’ या संस्थेमार्फत पर्यावरणाचं रक्षण करण्याची जनजागृती करत आहे. समुद्रात होणारे प्रदुषण मानवा बरोबर मस्त्य जीवावर उठले आहे. दररोज पाण्यात टाकला जाणारा कचरा भरती बरोबर मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर जमा होत असून तो उचलण्यासाठी एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने कंबर कसली. स्वच्छतेचा वसा घेताना त्याने फॉर फ्युचर इंडिया या संस्थेची स्थापना केली. आता पर्यंत किनाऱ्यावर शेकडो वेळा सर्व प्रकरचा कचरा एकत्र करून त्याची विल्हेवाट लावण्याचा विडा या सागरदूताने उचलला आहे. त्याच्या या महायज्ञात आज असंख्य मुलांबरोबर नागरिक अगदी उत्स्फूर्त पणे सहभागी होऊ लागले आहेत.

विलेपार्ले येथील साठे महाविद्यालयात द्वितीय वर्षात वाणिज्य शाखेत शिकत असताना हर्षद ढगे याने १ जानेवारी २०२० रोजी वयाच्या २० व्या वर्षी फॉर फ्युचर इंडिया या संस्थेची मुहूर्त मेढ रोवली. मित्रांबरोबर समुद्र किनाऱ्याची सैर करत असताना तेथील बकाल परिस्थिती मन अस्वस्थ करणारी होती. या पृथ्वीवर आपण जन्म घेतला त्याचे काहीतरी देणे लागतो या हेतूने प्रेरित झालेल्या हर्षद ढगे याने वसुंधरा वाचविण्याच्या मोहिमेत खारीचा वाटा उचलला. संस्थेच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला त्याला सुरुवाती पासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रथम चार ते पाच मित्रांच्या सोबतीने स्वखर्चाने सुरू केलेल्या समुद्र किनाऱ्याच्या साफसफाई मोहिमेत आज तब्बल ३०० ते ४०० लोक दर आठवड्याच्या शनिवारी, रविवारी ठरलेल्या ठिकाणी जमा होत आहेत. गेल्या 3 वर्षांपासून संस्थेने  25,000 हून अधिक स्वयंसेवकांसोबत लाखो लोकांमध्ये जागृती निर्माण केली आहे. समुद्रकिनारे आणि खारफुटी परिसरातून 1200 टनपेक्षा जास्त प्लास्टिक व मिश्रित कचरा गोळा करण्यात यश मिळवले. फक्त कचरा गोळा न करता त्यावर Recycle प्रक्रिया करण्याचासुद्धा प्रयत्न सुरु आहे.

सुरुवातीला सांताक्रुझ येथील जुहू त्यानंतर मिरा भाईंदर मधील उतन, वेलांकनी, तर मुंबई मधील गोराई, मनोरी या समुद्रकिनाऱ्यावर तर भाईंदर पूर्व खाडी, भाईंदर पश्चिम, गोराई खाडी, मानोरी खाडी येथे कांदळवन स्वच्छतेचे मिशन सुरूच आहे. आजूबाजूच्या नाला, गटारामधून येणारा कचरा समुद्रातच जमा होतो. लाकडी देव्हारे, प्लास्टिक चपल, काचा, गाध्या अशा विघटन न होणाऱ्या वस्तूही यात असतात. खारफुटी मध्ये या अडकून पडत असल्यामुळे त्यांच्या वाढीवरही परिणाम होत असून समुद्री जीवांचा अधीवासही नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे. हर्षद ढगे याच्या मिशनमुळे किनारे चकाचक होऊ लागले असून मुंबई व मिरा भाईंदर महानगरपालिकेने त्याच्या सामाजिक उपक्रमात साथ देत कचरा विल्हेवाट लावण्याची जबाबदारी स्वीकारली. शिवाय महापालिकेने समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी डस्टबिनची सोय केलीच. शिवाय सूचना फलक लावत नियम मोडणाऱ्या विरोधात दंडाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यासोबतच हर्षद ढगे यांच्या पाठपुरवठ्याला साथ देत नियमित स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्त व किनारा स्वच्छेतेसाठी आधुनिक गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

यासोबतच हर्षद ढगे आणि फॉर फ्युचर इंडियाने ३००० हून अधिक झाडे लावली आहेत. ऑक्सिजनची गरज जाणून स्थानिकांना फायदा व्हावा म्हणून अनेक झाडे लावली. FFI ने ‘जंजिरे धारावी किल्ला’ वर “गोडबंदर किल्ला’ येथे  स्वच्छता उपक्रम” देखील राबविला आहे. ट्रेकिंग व्यतिरिक्त, हर्षद ढगे याने अनेक किल्ल्यांवर स्वच्छता उपक्रम राबवले आहेत. प्रशासनाशी पत्रव्यवहार करून खारफुटीमध्ये टाकलेला डेब्रिज हटवून पुनर्वापर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सागरी जंगलाचे संवर्धन होण्यास मदत होते.

error: Content is protected !!