धारासूर येथील प्राचीन मंदिराचा होणार जीर्णोध्दार

सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांची प्रस्तावास संमती

0 94

 

 

परभणी / दिनकर देशपांडे – जिल्ह्यातील धारासूर येथील प्राचीन गुप्तेश्वर देवतेच्या मंदिराचा जीर्णोद्धार लवकरच होणार असून पुरातत्व विभागाने याबाबत सादर केलेला प्रस्ताव सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंजूर केला आहे. ते लवकरच या कार्याचा शुभारंभ या मंदिरास भेट देऊन करणार आहेत अशी माहिती धारासूर गावकर्यांनी दिली आहे.

 

 

परभणी जिल्ह्यामध्ये अनेक पुरातन मंदिरे आहेत. त्यापैकी गंगाखेड तालुक्यातील धारासुर येथील प्राचीन गुप्तेश्वराचे मंदिर दिर हे नागरस्थापत्य शैलीचे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे. उत्तम प्रतीचा दगड, विटा, चून्यात बांधलेले शिखर, चौकोनी चौरस गर्भगृह, सभा मंडप, दगडी कोरीव खांब, मंदिराचे उंच चौथरे, भिंतीवर देवतांच्या मूर्ती, सुंदर कलात्मक प्रवेशद्वारे ही सारी नागर स्थापत्य शैलीची वैशिष्ट्ये या गुप्तेश्वर मंदिरात आढळून येतात. मात्र गेल्या काही वर्षापासून हे सुंदर मंदिर मोडकळीस आले आहे. त्याचा जिर्णोद्धार होणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी गावकऱ्यांनी श्री गुप्तेश्वर मंदिर जीर्णोध्दार समिती स्थापन करून मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी प्रयत्न चालवले आहेत. अद्याप पर्यंत शासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र आता आ. रत्नाकर गुट्टे यांच्या मध्यस्थीने राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मंदिराचा पुरातत्व विभागाने तयार केलेला जीर्णोद्धाराचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यासाठी दोन टप्प्यांत आर्थिक तरतूद देऊ केली आहे. अशी माहिती गुप्तेश्वर मंदिर जीर्णोध्दार समितीचे सदस्य निवृत्ती कदम यांनी दिली आहे.

परभणी शहरापासून 30-35 किलोमीटर अंतरावर धारासुर गावी हे सुंदर मंदिर शिल्प उभे आहे. मुळात हे शिवमंदिर नसून विष्णू मंदिर असावे. कारण मंदिराच्या बाह्य भिंतीवर सर्व बाजूंनी विष्णू देवता गणपती, गरुड, या प्रतिमा आढळतात. याशिवाय गर्भग्रहातून मूर्तीवर टाकण्यात आलेले पाणी मंदिराच्या एका बाजूने बाहेर पडते तेव्हा ते गोमुखातून बाहेर आले तर तिथे मुख्य देवता महादेव असते. मात्र गुप्तेश्वर मंदिराच्या ठिकाणी गर्भग्रहातून बाहेर येणारे पाणी हे मगर सदृश्य शिल्पातून येते. त्यामुळे हे मंदिर शिवाचे नसून इतर देवतेचे असावे असे वाटते. त्यातही मंदिराच्या सर्व बाजूंनी विष्णू देवतेच्या सहदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आढळतात. त्यामुळे हे मंदिर विष्णूचे किंवा केशवराज देवतेचे असावे.

 

आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे गावकऱ्यांना या मंदिराचा शोध लागला तेव्हा त्या ठिकाणी मूर्ती अस्तित्वात नव्हती म्हणून ईश्वर गुप्त झाला आहे त्यावरून त्या मंदिरास गुप्तेश्वर देवतेचे मंदिर संबोधण्यात आले आणि तेथे महादेवाच्या लिंगांची स्थापना करण्यात आली . दरम्यान काही काळानंतर जवळून वाहणाऱ्या दक्षिणवाहिनी, गोदावरीच्या पात्रात मुले खेळत असताना त्यांना केशवराज विष्णू देवतेची एक सुंदर पाषाणमूर्ती वाळूत रुतलेली आढळली. मुलांनी ती उचलून बाहेर काढली. काळीशार, कोरीव, , हसतमुख उभी विष्णूची सुंदर मूर्ती पाहून सर्वांना खूप आनंद झाला. त्यांनी ती मूर्ती या गुप्तेश्वराच्या प्राचीन मंदिरात स्थापण्यासाठी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र मंदिर उंचावर असल्याने मूर्ती नेताना एक दोन ठिकाणी भंगली. भंगलेल्या मूर्तीची पूजा होत नसते या संकेताने ती मूर्ती वर न नेता गावातील एका जुन्या मंदिरामध्ये त्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. आजही ते केशवराजाचे मंदिर धारासुर येथे इतिहासाची साक्ष देत आहे.

गुप्तेश्वराचे प्राचीन मंदिर मात्र देखण्या स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना आहे. याबाबत दैनिक तरुण भारतचे पत्रकार संतोष शेणई यांनी आपल्या 30 जानेवारी 2022 रोजी लिहिलेल्या लेखांमध्ये या मंदिराचे खूप सुंदर वर्णन केले आहे. जमिनीपासून साधारण दहा फूट उंचीवर मंदिराचा मुलाधार बांधलेला दिसतो. जमिनीपासून चार भिंतीचे थर त्यानंतर पद्मथर गज थर व कफ चाली असे शिल्प थर संपल्यावर अधिष्ठान आहे मग पद्मस्थळ कनिष्ठ महापत्ता कुंभ स्थळ कुमुदस्थळ त्यानंतर मुंडोवर अशी ही रचना आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे मंदिर असलेल्या पिठावर जाण्यासाठी पूर्व दक्षिण व उत्तर दिशेने पायऱ्या आहेत उत्तर दिशाच्या मूळ दगडी पायऱ्या ढासळल्या असून गावकऱ्यांनी आता डाव्या बाजूने सिमेंटच्या नवीन पायऱ्या तयार केल्या आहेत. तसेच उत्तरेकडली भिंतही ढासळली असल्याने ती नवीन विटांनी बांधली आहे. मात्र मूळ मंदिराच्या ज्या जुन्या भिंती आहेत त्यावरील शिल्पकला अप्रतिम आहे. इतर दोन बाजूंनी असलेल्या प्रवेशद्वारावर उतरत्या छपरांचा सभामंडप आहे सभा मंडपाच्या उपपिठावरच्या गजरथात विविध मुद्रेतील हत्ती लक्ष वेधून घेतात पूर्वेकडे कक्षासनयुक्त मुखमंडप आहे उत्तर व दक्षिण बाजूस वामनस्तंभावर तोललेले अर्धमंडप आहेत. बाहेरील बाजूस जाळीयुक्त नक्षीकाम आहे. खाली अर्धस्तंभावर सूरसुंदरी व अन्य मानवी देहधारी आहेत. अर्ध मंडपातून मुख्य सभा मंडपात गेल्यानंतर खांबावरील कोरीव नक्षीकाम पाहून आपण अचंबित होतो. मंदिराचे छत नवरंगी स्वरूपाचे आहे म्हणजे छताला वेगळे नऊ चौकोन करण्यात आलेले आहेत. सभा मंडपाची ही मुख्य वैशिष्ट्य सांगता येतील. नाजूक शंकरपाळ्याच्या आकारात एकसंध कोरलेल्या खिडक्या हवा खेळती ठेवतात व प्रकाशही पुरवतात. त्याचवेळी पुरेसा आडोसा ही देतात सभामंडळातील दोन देवकाष्टे रिकामी आहेत.

 

हे मंदिर उत्तर चालुक्यकालीन इसवी सनाच्या 11 व्या शतकामध्ये बांधलेले असावे. त्या काळात परभणी जिल्हा हा विदर्भाचा एक भाग होता. कल्याणीचे चालुक्यांचे अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, नांदेड हिंगोली, परभणी एवढ्या मोठ्या भागावर राज्य होते. यातील वत्सगुल्म अर्थात वाशिम ही तत्कालीन चालुक्याच्या राज्याची राजधानी होती. चालुक्य राजे वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते. तसेच त्यांनी शिव व विष्णूंची सुंदर मंदिरे या भागात मोठ्या प्रमाणात बांधली. त्यातीलच हे गुप्तेश्वराचे एक मंदिर असावे असे वाटते.

 

 

श्री सेणई या इतिहास अभ्यासकांच्या मते, अंतराळातील देव कोष्टात गणेशाचे व विष्णूचे शिल्प आहे गर्भ ग्रहाला पात्र गंधर्व स्तंभ व्यायामशल्प असे पंच शाखाद्वार आहे पाचही खांबावरील कोरीव काम लक्षवेधक आहे ललाट बिंबावर श्री गणेश विराजमान आहेत या पंचस्तंबापैकी उजव्या डाव्या स्तंभावर वैष्णव द्वारपाल आहेत गंगा यमुने सहचार धाम धारीनी देखील कोरलेले आहेत . आत महादेवाची पिंडी त्यावर मुखवटा चढवलेला आहे अंतराळात पितळेचा नंदी आहे. या मंदिराचे शिखर पंचभूम पद्धतीचे आहे म्हणजे पाच थरात बांधलेले भूमीत प्रकारचे घडीव विटांचे हे शिखर आहे आतून पोकळ असल्याने या शिखराचा भार मंदिरावर कमी येतो अशा प्रकारचे अजूनही टिकून असलेली ही महाराष्ट्रातील तरी एकमेव शिखर आहे .

 

मंदिराच्या बाहेरील भिंतीवर विष्णूच्या पंच ब्रह्म संकल्पनेतील श्रीधर, त्रिविक्रम, ऋषिकेश, पद्मनाभ व दामोदर ही पाच शिल्पे आढळतात. तसेच मदन, नृत्य गणेश व चामुंडा यांची एक एक शिल्प ही अंकित केले आहे. मात्र भक्तांनी नृत्य गणेशाचे सुंदर शिल्प शेंदूरमार्जीत केल्याने त्याचे सौंदर्य लोपले आहे.

 

या मंदिराच्या प्रदर्शना मार्गावर भिंतीवर 28 सुरसुंदरी च्या मूर्ती कोरलेल्या आहेत. येथे अतिशय सुंदर मिथुन शिल्पे असून अप्सरांची अनेक विलोभनीय रुपे कलाकाराने कोरली आहेत. कोणी नावं आपला केस संभार वाळवीत मोर पिसाऱ्याचा डौल मिरवते, कुणा सुंदरीचे अधोवस्त्र माकड ओढते आहे, कोणी दूर गेलेल्या प्रियकराला पत्र लिहिते आहे, कुणी आपल्या पोपटाला द्राक्ष भरवीत आहे, कोणी विषकन्या सुंदरी साप व विंचू खेळवीत आहे, असे अनेक रूपे या ठिकाणी दिसतात. त्यातही शत्रुमर्दिनी, सर्पधारीणी, विषकन्या, भैरवी, आलसा वसनभ्रमसा, सिंहमर्दिनी तोरणा, चंद्रावली, पद्मगंधा, नाग व मुंगुसाला खेळवणारी ललना अशा कितीतरी स्त्रीमूर्ती अप्सरा येथे आढळतात. तेव्हा विस्मय वाटतो. खांबावरील नक्षीकाम, छतावरील कोरीव काम पाहून माणूस आश्चर्य चकित होतो. विशेष म्हणजे
केशवराजाची काळ्या पाषाणाची मूर्ती अशीच रेखीव व मनोहर आहे. पुरुषी सौंदर्याची सर्व वैशिष्ट्ये तिच्या दिसून येतात केशव राजाच्या मस्तकाभोवती नक्षीदार प्रभावळ आहे त्यावर दशावतार कोरलेले आहेत केशव राजाच्या मुखावर मोहक स्मित हास्य असून त्याचे शरीर भरदार व सौष्ठवपूर्ण आहे. अंगावर अलंकार करा कसुरीने कोरलेले आहेत जवळ गरुड अंजली मुद्रेत उभा आहे. मंदिरातील सर्वच मूर्त्या, धष्टपुष्ट व आणि प्रमाणबद्ध वाटतात.

 

हा शिल्प सौंदर्याचा अमोल ठेवा संरक्षित केला जावा, जपला जावा यासाठी गावकरी निवृत्ती कदम, दिंगबरराव कदम , मदन कदम व मंदिर जीर्णोध्दार समितीचे सर्व सदस्य मोठे प्रयत्न करीत आहेत. जिल्हावासियांनी यास पाठींबा द्यावा असे त्यांचे आवाहन आहे. त्यांना यश येवो हीच अपेक्षा.

– लेखक: श्री दिनकर के. देशपांडे
लोकमान्य नगर, परभणी.
मो. ९७६६४८८८९२.

error: Content is protected !!