…तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू, राहुल गांधींची घोषणा

0 42

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज पुण्यात सभा पार पडली. काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने राहुल गांधी यांची आज पुण्यात सभा पार पडली. या सभेत राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली. लोकसभा निवडणुकीनंतर देशात इंडिया आघाडीचं सरकार आलं तर देशात आरक्षणाची असलेली 50 टक्के मर्यादा हटवू, अशी मोठी घोषणा राहुल गांधी यांनी आज केली. राहुल गांधी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी आणि भाजपला संविधान मिटवायचं आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.

“लढाई संविधानाला वाचवण्यासाठी आहे. एकीकडे काँग्रेस पक्ष, इंडिया आघाडी आहे, संविधान, लोकशाहीला वाचवण्यासाठी लागली आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस संविधानाला खतम करु इच्छित आहेत. हे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलं आहे. या संविधानात महात्मा फुले यांचे विचार आहेत. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु ज्यांनी मिळून हिंदुस्तानच्या जनतेसोबत वर्षानुवर्षे लढाई करुन देशाच्या जनतेला दिलं. संविधानाला नरेंद्र मोदी आणि भाजप बदलण्यासाठी इच्छुक आहेत”, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

‘जे तुमच्या हातात आहे ते सर्व 20 ते 25 लोकांच्या हाती जाईल’

“याच संविधानामुळे भारताच्या गरीब, होतकरु, शेतकरी, मागास, दलित, अल्पसंख्याक, आदिवासींना अधिकार मिळतात. या संविधानाशिवाय काहीच नाही. जे काही तुमच्या हातात आहे ते सर्व देशाच्या फक्त 20 ते 25 लोकांच्या हाती चाललं जाईल”, असा दावा राहुल गांधींनी केला.

“मनरेगा बनलं, भोजनाचा अधिकार, जमीन अधिग्रहन बिल, हरितक्रांती, धवलक्रांती, बँकांचा राष्ट्रीयकरण हे सर्व काम संविधानाने आपल्याला दिलं आहे. भाजप ज्यादिवशी या संविधानाला संपवून टाकेल तेव्हा तुम्ही भारताला ओळखू शकणार नाहीत. ही लढाई आहे. मी देशाला सांगू इच्छितो, जे आपल्याला बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी यांनी दिलं त्याला आपण कधी संपू देणार नाही”, असं राहुल गांधी म्हणाले.

‘आम्ही 50 टक्के आरक्षणाची मार्यादा हटवून टाकू’

“कधी त्यांचे नेता संविधान बदलण्याबद्दल बोलतात, तर कधी बोलतात की, आरक्षण संपवून टाकणार. मोदींनी फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्यावं, हे 50 टक्के आरक्षणाची मर्यादा आहे, ही मर्यादा त्यांनी कुठेही सांगावं की, ते 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवून टाकणार. त्यांनी कुठेही जावून सांगावं. आम्ही निर्णय घेतला आहे की, निवडणुकीनंतर आम्ही ही मर्यादा, ज्यामुळे कोट्यवधी नागरिकांचं नुकसान होत आहे, 50 टक्क्यांची मर्यादा आम्ही तोडून टाकू आणि बाहेर फेकून देऊ”, असं राहुल गांधी म्हणाले.

“देशात 15 टक्के दलित लोकसंख्या आहे, 8 टक्के आदिवासी आहेत, जवळपास 50 टक्के मागास वर्गाची लोकसंख्या आहे. या तिघांची एकूण टक्केवारी ही 73 टक्के आहे. जनतेला सर्व माहिती आहे”, असंदेखील राहुल गांधी यावेळी म्हणाले.

error: Content is protected !!