विनोद तावडे,पंकजा मुंडे पुन्हा एकदा वेटिंगमध्येच..अशोक चव्हाणांसह ..

0 218

: भारतीय जनता पक्षाने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या २४ तासांनंतर अशोक चव्हाण यांना लगेचच राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांनाही राज्यसभेची लॉटरी लागलेली आहे. दुसरीकडे विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पत्ता मात्र भाजपने कापलेला आहे. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे तसेच पंकजा मुंडे यांच्या नावाचीही चर्चा होती. परंतु पुन्हा एकदा ही नावे वेटिंगमध्येच राहिली.

कोथरूडमधून तत्कालिन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधानसभा निवडणूक लढल्याने मेधा कुलकर्णी यांना तिकीट कापलं होतं. गेल्या चार वर्षांपासून त्यांना डावलल्याची भावना निर्माण झालेली होती. जशीही विधान परिषद किंवा राज्यसभा निवडणूक यायची तेव्हा त्यांच्या नावाची चर्चा व्हायची. अखेर भाजपकडून त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलेलं आहे.दुसरीकडे भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाण यांना देखील राज्यसभेची लॉटरी लागलेली आहे. कदाचित प्रवेश करण्याआधीच राज्यसभा उमेदवारीचं आश्वासन त्यांना भाजप पक्षश्रेष्ठींकडून दिलं गेलं असावं, अशीही चर्चा आहे.

त्याचवेळी अजित गोपछडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर कार्यकर्ते असल्याने तसेच पक्ष संघटनेतील त्यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे. त्याचवेळी मराठा-ब्राह्मण आणि लिंगायत समीकरण भाजपने साधलं आहे.

कोण आहेत डॉ. अजित गोपछडे?

डॉ. अजित गोपछडे हे भाजपाच्या डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्षही आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपा संघटनेत काम करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले गोपछडे यांनी विद्यार्थी देशत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकारणाची सुरुवात केली. एकेकाळी त्यांनी कारसेवा केली होती. भाजपाशी निष्ठावान असलेला नेता म्हणून गोपछडे यांची ओळख आहे. त्यामुळे संघटनेतील एका निष्ठावान पदाधिकाऱ्याला उमेदवारी दिली, असे सांगितले जात आहे.

यंदा राज्यसभा निवडणुकीत निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या ४१.०१ मतांची आवश्यकता असेल. भाजपाचे गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने विधानसभेतील एक जागा रिक्त आहे. भाजपाचे १०४ आमदार असले तरी १३ अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षांच्या मदतीने भाजपाला तीन जागा सहजपणे मिळू शकतात. काँग्रेसचे ४५ आमदार असल्याने या पक्षाचा एक उमेदवार निवडून येण्यात काहीच अडचण येणार नाही. शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांना ४० पक्षाच्या आमदारांचा पाठिंबा असून, अपक्ष व छोट्या पक्षांचे १० जण बरोबर आहेत. या संख्याब‌ळाच्या आधारे शिंदे गटाचा एक उमेदवार निवडून येईल.

राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४३ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार गटाकडून केला जातो. या संख्याबळाच्या आधारे अजित पवार गटाला एक जागा सहजपणे मिळू शकते. उद्धव ठाकरे गटाकडे १५ तर शरद पवार गटाकडे १० आमदार आहेत. दोन्ही पक्ष एकत्र येऊन संयुक्त उमेदवार उभा केला तरी ४१ हा जादुई आकडा गाठणे सद्यस्थितीत कठीण दिसते. यामुळे शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाला राज्यसभेतील आपापल्या जागा गमवाव्या लागणार आहेत.

error: Content is protected !!