अजित पवार मुख्यमंत्री होणार का ?..शरद पवारांनी हिशोबच केला
अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात घडणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बोचरा वार केला. शरद पवार आज अकोला दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सहकार मेळाव्याला हजेरी लावली. या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना इंडिया आघाडीत (I.N.D.I.A.)घेण्यास आम्ही सकारात्मक आहोत. त्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.
काय म्हणाले शरद पवार?
सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या एका वक्तव्यासंदर्भात पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न केला. त्यावर शरद पवारांनी खोचक शब्दांत उत्तर दिलं. “अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी सर्वप्रथम त्यांच्या गळ्यात हार घालून अभिनंदन करेन”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यावर शरद पवार म्हणाले, “हे स्वप्न आहे.. ही काही घडणारी गोष्ट नाही!”
“आज देशभरातलं चित्र भाजपाविरोधी आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये भाजपा नाही. गोव्यातही नव्हतं. फोडाफोडी करून त्यांचं राज्य आलं. महाराष्ट्रात फोडाफोडी करून त्यांचं राज्य आलं. गुजरात त्यांच्याकडे आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपाचं राज्य नव्हतं. तिथे आमदार फोडून सत्ता मिळवली. राजस्थान, दिल्ली, पंजाब, झारखंडमध्ये भाजपा नाही. देशात ७० टक्के राज्यांत भाजपा नाही. हीच स्थिती पुढेही कायम राहील असा आम्हाला विश्वास आहे”, असंही शरद पवार पुढे म्हणाले.
‘अजित पवार..राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस’
दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेला खुलं पत्र लिहिलं होतं. या पत्रात सत्तेत सहभागी होण्यामागची विकासाची भूमिका अजित पवारांनी मांडली होती. या पत्रामध्ये त्यांचा स्वत:चा उल्लेख ‘अजित पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस असा केला होता. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. त्यासंदर्भात पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न केला असता त्यावर त्यांनी खोचक शब्दांत उत्तर दिलं. “माझी काही हरकत नाही. उद्या संयुक्त राष्ट्रांचे अध्यक्ष लिहिलं तरी हरकत नाही”, असं शरद पवार म्हणाले.
या सगळ्यामागे शरद पवार?
दरम्यान, या सर्व खटाटोपामागे शरद पवार असल्याची शक्यता काहीजण वर्तवत असल्याबाबत विचारणा केली असता शरद पवारांनी ती बाब फेटाळून लावली. “आमची भूमिका स्पष्ट आहे. आत्ता निवडणूक आयोगात केस माझ्यावर आहे. माझ्याविरुद्ध राष्ट्रीय पातळीवर आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आणि या सगळ्या प्रकरणात आमचा सहभाग आहे असं म्हटलं जातंय. याला काही मर्यादा असायला पाहिजे”, अशा शब्दांत शरद पवारांनी सुनावलं.
अजित पवार गटाला सुनावलं
दरम्यान, यावेळी शरद पवारांनी अजित पवार गटालाही सुनावलं. “मुद्दा हा आहे की ते निवडून कुठल्या पक्षावर आले? ते कोणत्या चिन्हावर निवडून आले? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी बसलोय. या पक्षाच्या नेतृत्वाखाली, त्याच्या पुण्याईनं, त्याच्या वतीनं निवडणुका लढवून निवडून आल्यानंतर भाजपाबरोबर जे जातात, त्यांच्याबद्दल काय बोलायचं?” असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला.