त्रैलोक्य आधार – श्रीराम – मनाचे श्‍लोक (भाग 30)

0 295

समर्थाचिया सेवका वक्र पाहे ।
असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥30॥
अर्थ: हे मना ! माझा हा राम परमसमर्थ आहे. रामाच्या सेवकाकडे वाकड्या नजरेने पाहिलं असा त्रिभुवनात कोण आहे ? रामाची लीला त्रैलोक्यातले देव, मानव, दानव गाऊन राहिले आहेत.
या संबंधाने एक गोष्ट आठवते. एक गावात एक अतिशय रागीट व समर्थांचा द्वेष करणारा माणूस रहात होता. त्याला वाचासिद्धी प्राप्त झाली होती. एकदा समर्थ फिरत फिरत त्या गावी आले. नेहमी प्रमाणे त्यांचे शिष्य गावात भिक्षा मागायला गेले. गोपाळ नामक शिष्य त्या गृहस्थांच्या घरासमोर उभा राहीला व त्याने वरील श्‍लोक खड्या सुरात म्हटला , झाले त्या गृहस्थाचा संताप एवढा वाढला की त्याने तावातावाने बाहेर येउन त्या शिष्याला म्हटले की आज रात्री तू मरणार. गावातल्या लोकांनी गोपाळला सांगितले की आता तुझे काही खरे नाही तू आज रात्री मरणार हे नक्की.
गोपाळ बिचारा खुप घाबरला तसाच पळत समर्थांकडे गेला व त्यांना सर्व हकीकत सांगितली, समर्थ काही बोलले नाहीत फक्त हसले. रात्री समर्थ एका घोंगडीवर झोपले व गोपाळला पाय चेपायला सांगितले. थोड्या वेळाने यमदूत आले पण ते थोड़े लांब उभे राहीले. गोपाळला म्हणाले की तू घोंगडीवरुन बाहेर ये आम्ही तुला न्यायला आलो आहोत. गोपाळ कसला घोंगडी सोडतोय. शेवटी सकाळ झाली. यमदूत निघून गेले.
समर्थ उठले व गोपाळला म्हणाले की तू आज परत त्याच गृहस्थाकडे जाउन भिक्षा माग. तो म्हणाला जातो पण तेवढी घोंगडी मला द्या. तेथे जाउन त्याने परत तोच श्‍लोक म्हटला तसे ते गृहस्थ बाहेर आले. आपली भविष्यवाणी खोटी ठरविणार्‍या समर्थांचे शिष्यत्व पत्करले.
समर्थ रामदासस्वामी आपल्या या मनाच्या श्‍लोकामध्ये आपल्या या मनाला समजावून सांगतात कि हे मना जो परमेश्‍वराची मनापासून सेवा करतो भक्ती करतो, जो भक्त सर्वगुणसंपन्न आहे, अशा भक्ताकडे वाईट दृष्टी ठेवणारा या त्रैलोक्यात कोणी नाही, प्रत्यक्ष कली आणि काळ सुद्धा अशा भक्ताला भिऊन असतात. म्हणून हे मना माझ्या बाळा त्या प्रभूची भक्ती कर तो दिनाचा दयाळू आणि मनाचा मवाळू आहे.
हा श्‍लोक म्हणजे एकदम खड्या स्वरात प्रभावीपणे , प्रचंड आत्मविश्‍वासाने भक्ताला दिलेले आश्‍वासन आहे.
समर्थ रामदास स्वामी श्रीरामांना समर्थ म्हणतात. समर्थ याचा अर्थ जो उत्तम गुणांनी संपन्न आहे ,पराक्रमी आहे ,बलाढ्य आहे ,दीनांचे ,दुबळ्यांचे ,भक्तांचे रक्षण करणारा आहे .
प्रभू श्रीरामांचे चरित्र असेच संपन्न , आदर्श , आचरणात आणण्यासारखे , दुष्टांचा संहार , दिनांचा उध्दार करणारे आहे .अशा समर्थांच्या सेवकाकडे म्हणजे प्रभू रामांच्या सेवकाकडे वाकड्या नजरेने पाहणारा या जगात कोण आहे?
त्यांची ख्याती तिन्ही लोकांत आहे, तो सदैव आपल्या सोबत आहे.
श्रीरामांचे चरित्र ज्यात आहे ते शतकोटी रामायण श्री शंकरांनी तीनही लोकांत म्हणजे देव , दानव आणि मानवात वाटून दिले . त्यामुळे देव ,दानव आणि मानव तिघेही श्रीरामांचे गुणगायन करतात . ते श्रीराम आपल्या दासाची उपेक्षा करत नाहीत . श्रीरामांचा दास कसा असतो ते श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात…
भव्य रूप अति सुंदर दीक्षा ।
रामनाम स्मरणे करी भिक्षा ।
वृती होईल उदासीन जेव्हा ।
रामदास म्हणे तेव्हा ॥
पाणी जर वाहते नसेल तर ते अशुद्ध होते , म्हणून पाणी वाहतेच हवे. अर्थात जरी मन जरी शुद्ध झाले आहे असे वाटले तरी साधना भक्तीभावाने ही चालूच ठेवायला /रहायला हवी. वाहणारी गंगाच शेवटी समुद्राला मिळू शकते तसेच सतत न कंटाळताता केलेली साधनाच शेवटी भक्त व भगवंताचे ऐक्य घडवून आणते.
अशाप्रकारे समर्थ आपल्या मनाला त्या प्रभूची भक्ती करण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत.
या श्‍लोकात हीच गम्मत आहे. समर्थ म्हणजे समर्थ रामदासस्वामी व समर्थ म्हणजे प्रभु रामचन्द्र , यामुळे असे वाटते की समर्थ रामदास व प्रभु रामचन्द्र एकच आहेत असे तर रामदास स्वामींना सुचवायचे नसेल ना ?
धन्य ते शिष्य ज्यांना समर्थांसारखा समर्थ गुरु मिळाला.
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
ज्योती कुलकर्णी, मुंबई

error: Content is protected !!