“दांभिकतेचा विकार” – मनाचे श्लोक भाग-६

0 171

नको रे मना क्रोध हा खेदकारी
नको रे मना काम नाना विकारी
नको रे मना सर्वदा अंगिकारू
नको रे मना मत्सरू दंभभारू ॥6॥

अर्थ: मना, क्रोध, जो खेदकारक असतो आणि काम, वासना, ही नाना प्रकारे विकारी असते. त्यांचा अंगीकार करू नकोस आणि मत्सर, भोंदूगिरी यांना देखील जवळ करू नकोस.

समर्थ या श्‍लोकात सांगताहेत, हे मना, क्रोध हा खेदकारक असतो. अति क्रोध केल्याने माणसाच्या हातून अविचारी, आततायी कृत्ये घडण्याची शक्यता असते आणि अशा अविचारी कृत्यांचा अंतिम परिणाम खेदजनक होतो. तसेच काम, म्हणजे अभिलाषा हीदेखील विकारी म्हणजे मनाची चलबिचल वाढवणारी असते. अर्थात क्रोधापासून किंवा कुठल्याही गोष्टीची इच्छा, अभिलाषा धरण्यापासून मनुष्यप्राण्याला संपूर्णपणे आणि नेहमीच सुटका मिळणे अशक्यप्राय असते. किंबहुना थोड्या प्रमाणात या भावना स्वाभाविक आहेत. फक्त हे मना, या भावनांचा सदासर्वदा, म्हणजे अगदी पदोपदी अंगिकार करू नये.

क्रोध मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. रागामुळे मनुष्य स्वत:चे फार मोठे नुकसान करून बसतो आणि नंतर फक्त उरतो तो असतो पश्‍चात्ताप. क्रोधामुळे आपल्या लोकांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि जन्मभराचे संबंध एका क्षणात संपुष्टात येतात.

अरस्तू यांनी लिहिलेलं विधान अगदी योग्य आहे- क्रोध निर्माण होणं ही एक सहज प्रतिक्रिया आहे. पण योग्य व्यक्तीवर, योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य हेतूने क्रोध उत्पन्न होणं खूप कठीण आहे.

माणसाच्या गरजा फार थोडया असतात. त्या पुर्‍या होणं सहज शक्य असतं. त्यात काही अडचण नसते. सगळयांच्या गरजा पुर्‍या होऊ शकतात. वासना, अपेक्षा मात्र पुर्‍या होऊ शकत नाहीत.

गीतेत सांगितल्याप्रमाणे
विचार मनि जो करि विषयाचा होई आधीन । आधिनता मग जने वासना राग वासनेतून ॥रागातुन जन्मतो मोह जो करी स्मरणर्‍हास । विस्मरणाने बुध्दि फिरे तदनंतर हो नाश ॥

वासना अहंकार पैदा करते आणि वाढवते. आवश्यकता किंवा गरज पूर्ण झाली तर समाधान निर्माण होतं. तुम्ही या समाधानाचा शोध घ्यावा.
समर्थ याच्यापुढे सांगतात की, मत्सर, हेवा, दंभ म्हणजे ढोंग हे देखील अंती नुकसानकारक असतात म्हणून ते कधीही मनात जोपासू नये.
‘मद् सर’ म्हणजे ‘मद्’चं, खर्‍या स्वरूपाचं भान सुटून द्वैतमय स्थितीचं भानंच वाढत जातं तेव्हा मत्सराचा प्रवेश होतो. मत्सर आपल्या वैचारिक, मानसिक, बौद्धिक पातळीवरच घाला घालतो. खर्‍याचं आकलन संपतं आणि आपल्या मनाला जे वाटतं त्याचाच हेका माणूस धरू लागतो.

समर्थ ‘षड्रिपुनिरूपण’ या लघुप्रकरणात सांगतात, “मत्सरें सत्य मानेना सत्याचें लटकें करी॥” मत्सरापायी माणूस जे सत्य आहे, खरं आहे ते खरं मानतच नाही. त्या सत्यावरच असत्याचा आरोप करतो.
दांभिकता म्हणजे खोटेपणा. काम करून घेण्यापुरत सगळं छान छान दाखवणे ,आतुन मात्र वेगळे विचार असणे.
दुसरे काय करतात वा करत नाहीत तिकडे लक्ष देऊ नका, तर आपण काय करत नाही वा करतो, तिकडे लक्ष ठेवा. -गौतम बुद्ध

असे म्हणतात कि,
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. म्हणुनच जशी झाडाला पाण्याची गरज असते, जशी लेकराला मायेची गरज असते तसेच मनाला दांभिक व ढोंगीपणापासुन दूर ठेवावे व सुविचारांची कास धरावी म्हणजे आयुष्य चांगले घडवायला प्रेरणा मिळते.

॥जय जय रघुवीर समर्थ॥
ज्योती कुलकर्णी, मुंबई

error: Content is protected !!