भक्तांचा कैवारी – श्रीराम -मनाचे श्‍लोक (भाग 28)

0 250

दिनानाथ हा राम कोदंडधारी।
पुढें देखतां काळ पोटीं थरारी॥
मना वाक्य नेमस्त हे सत्य मानीं।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥28॥
अर्थ : धनुष्य बाण हाती घेतलेला राम, कोदंडधारी. ज्याला पाहून प्रत्यक्ष काळाला देखील कापरें भरती.
लोकहो ,एक वाक्य नेहमी कोणताही विकल्प किंवा शंका मनात न आणता लक्षात ठेवा .हे त्रिवार सत्य आहे की प्रभु रामचंद्र आपल्या भक्तांची उपेक्षा कधीही करणार नाहीत.
कोदंडधारी- धनुर्धारी
नुपेक्षी म्हणजे न + उपेक्षा .दुर्लक्ष
समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी अफाट, विपुल वाङ्मय निर्मिती केली. दासबोध, मनाचे श्‍लोक, करुणाष्टके, भीमरूपी स्तोत्र,अनेक आरत्या उदाहरणार्थ, सुखकर्ता दुखहर्ता, ही गणपतीची आरती, लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा, ही शंकराची आरती, अशा त्यांच्या लेखनकृती प्रसिद्ध आहेत. अनेकविध अभंग, आरत्या, भूपाळ्या, पदे, स्तोत्रे, राज-धर्म, क्षात्र-धर्म, शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांस पत्रे आदी विषयांवरील विपुल लेखन समर्थांनी केले आहे.
समर्थ रामदास स्वामी आपल्या या मनाच्या श्‍लोकामध्ये त्या परमात्म्याच्या शक्तीचे वर्णन करतात.
समर्थ रामदासांचे गुरु हे प्रभू श्रीरामचंद्रच आहेत, ते त्यांचीच भक्ती करीत होते, त्यांचं नाम सदैव समर्थांच्या मुखामध्ये होते.
समर्थ आपल्या श्‍लोकामध्ये त्याच श्रीरामांचे वर्णन करताना म्हणतात कि माझा प्रभू श्रीराम बलशाली, प्रखर तेजाने भरलेला, त्यांचे दंड हे धनुष्याने सुशोभित आहेत. त्यांचे हे रूप पाहून प्रत्यक्ष काळ, मृत्यू सुद्धा थर थर कापतो.
मागील श्‍लोक 27 पासून पुढे 10 श्‍लोकांपर्यंत भक्तवत्सल रामाचे , त्याच्या सामर्थ्याचे वर्णन आहे. अनेकविध उपमांनी समर्थांनी राघवाचे श्रेष्ठत्व सांगितले आहे आणि हा श्रीराम दासाचा ,भक्तांचा अभिमानी आहे आणि त्याची कधीच उपेक्षा करीत नाही. हा विश्‍वास दृढ व्हावा म्हणून 11 श्‍लोकांच्या शेवटी
’नुपेक्षी कदा रामदासाभिमानी’
हेच पुन्हा पुन्हा सांगितले आहे.
मागील श्‍लोकापासून पुढील 10 श्‍लोकांचा शेवटचा चरण नुपेक्षी कदा राम दासाभिमानी असे घेतले तर प्रभु रामचंद्र हे आपल्या दासाचे शरणागताचे अभिमानी आहेत असा अर्थ होइल व रामदासभिमानी असे वाचले तर रामदास प्रभु रामचन्द्रांबद्दल अभिमानी आहेत असे म्हणता येइल.
यातून समर्थ भक्तांना,साधकांना, जणांना आधार देत आहेत. प्रत्येकाला आपल्याला कोणाचातरी आधार आहे त्या बळावर मोठे धैर्य वाटत असते. तो कुणी ही असो त्यामुळे आत्मविश्‍वास वाढतो. सर्व आधाराचा मुख्य आधार शेवटी परमेश्‍वरच आहे हे सांगण्याची कार्य सेवा संत करतात. ईश्‍वरच आपला वाली तोच आपला नाथ तोच करता आणि करविता असा विश्‍वास,श्रद्धा,पूर्ण निष्ठा ठेवावी.
त्यांच्या ज्ञानाच्या तेजाने अज्ञानाचा अहंकार नष्ट होतो, त्यांच्याकडच्या विवेकामुळे विषय विकार सुद्धा पळून जातात.
जना वाक्य नेमस्त हें सत्य मानीं।” जो नेमस्त आहे, अर्थात जो सदोदित नेम-स्थ आहे, नेमात आहे त्यालाच सद्गुरू कसा पाठीराखा आहे आणि त्याची कशी सर्वत्र सत्ता आहे, याचा अनुभव येऊ लागेल!
’साखर गोड आहे,’ या वाक्याचं सत्यत्व साखर खाल्या शिवाय जाणवत नाही.. तेव्हा सद्गुरू पाठीराखा आहे, याचं सत्यत्व अनुभवात यायला हवं असेल तर आपण नेमस्त झालं पाहिजे, सदोदित नेमात राहाण्याचा अभ्यास केला पाहिजे. आता नेम म्हणजे ठरावीक साधना. आपणही नेम करतो, पण तो रोज होईलच याचा काही नेम नसतो! तर इथे नेम या शब्दाचेही दोन अर्थ आहेत. नेम म्हणजे ठरावीक साधना, हा अर्थ आहेच, पण लक्ष्यावर अचूक नेम साधणारी साधना हाही अर्थ आहे! लक्ष्यावर अचूक नेम हा जसा एकाग्रतेनंच साध्य होतो, तशा एकाग्रतेनं केलेली साधना हा नेम आहे आणि अशा एकाग्र नेमात जो सदोदित राहातो त्यालाच नेमस्त म्हटलं आहे.
म्हणून समर्थ आपल्या मनाला या श्‍लोकामधून हे समजावून सांगत आहेत कि…
हे मना, तू त्या राघवाची भक्ती करून त्यांचा दासानुदास बनून राहा, कारण प्रभू आपल्या भक्तावर नेहमी कृपा करतात, ते प्रेमळ आहेत. ते कधीच आपल्या भक्ताला एकटे सोडत नाहीत, हे सत्य विधान शाश्‍वत आहे. परमेश्‍वराला आपल्या भक्ताची ओढ असते, परमेश्‍वराचा आपल्या भक्तावर विश्‍वास असतो, म्हणून हे मना तो विश्‍वास मिळवण्याइतकी निष्ठेने तू भक्ती कर.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
ज्योती कुलकर्णी, मुंबई

error: Content is protected !!