हिंगोली (विशेष प्रतिनिधी):
हिंगोली शहरातील महसूल कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात आलेली जिल्हा ग्रंथालयाची भव्य आणि टोलेजंग इमारत अखेर पूर्णपणे तयार झाली आहे. आकर्षक बांधकाम आणि अद्ययावत सुविधांनी युक्त असलेली ही इमारत सध्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र, काम पूर्ण होऊनही ही वास्तू केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत कुलूपबंद असल्याने शहरातील वाचक, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र निराशा पसरली आहे.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी या नव्या इमारतीचे दिमाखात उद्घाटन होईल आणि ती वाचकांच्या सेवेत दाखल होईल, अशी जोरदार चर्चा वाचक वर्गात सुरू होती. परंतु, १५ ऑगस्ट उजाडून निघून गेला तरी उद्घाटनाचा कोणताही मुहूर्त ठरला नाही. त्यामुळे “इमारत सज्ज असताना उद्घाटनाची टाळाटाळ का?” असा प्रश्न आता वाचक वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.
हिंगोलीतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण, संशोधक आणि नियमित वाचकांसाठी हे ग्रंथालय अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. जुन्या इमारतीत असणाऱ्या अपुऱ्या जागेमुळे वाचकांना अभ्यासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नवीन प्रशस्त इमारत सुरू झाल्यास शेकडो विद्यार्थ्यांना शांत व समृद्ध अभ्यासाचे वातावरण उपलब्ध होणार आहे.
इमारतीचे काम पूर्ण झालेले असताना केवळ औपचारिकता आणि उद्घाटनाच्या विलंबामागे कोणते कारण आहे, असा सवाल नागरिक करत आहेत. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून उद्घाटनाची वेळकाढूपणा दूर करावी आणि ही वास्तू लवकरात लवकर वाचकांसाठी खुली करून द्यावी, अशी आग्रही मागणी हिंगोलीतील सुजाण नागरिक व अभ्यासकांकडून केली जात आहे.
Shabdraj www.shabdraj.com