17/08/26
Breaking News

मराठा महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य भोवले:नवनाथ वाघमारेंवर अखेर गुन्हा दाखल

‘ओबीसी नेत्यांची गोंडस मुले आणि पैसा पाहून मराठा समाजाच्या मुली त्यांच्या घरात घुसतात,’ असे अत्यंत संतापजनक आणि आक्षेपार्ह विधान करणारे ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्यावर अखेर जालना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विधानावरून राज्यभरात मराठा समाजातील महिला कमालीच्या आक्रमक झाल्या होत्या. वाढता दबाव आणि ठिकठिकाणी होणाऱ्या निदर्शनांनंतर वाघमारे यांनी आपल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त करत माफी मागितली आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत नवनाथ वाघमारे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना थेट नेत्यांच्या घरातील महिलांना लक्ष्य केले होते. ते म्हणाले होते: “स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे की, माझी सून मराठा आणि बायको कुणबी आहे. त्यांच्या घरात सगळे ‘सोयरे’ घुसले असतील. फक्त बावनकुळेच नाही, तर अनेक ओबीसी मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसल्या आहेत. ओबीसी मंत्र्यांची गोंडस मुले आणि पैसा दिसला की मराठा मुली त्यांच्या घरात घुसून लग्न करतात. जर हे मंत्री मराठ्यांच्या मुलींचे ऐकून ओबीसींचे वाटोळे करत असतील, तर त्यांनी समोर येऊन सांगावे, असेही वाघमारे म्हणाले होते.

जालन्यात गुन्हा दाखल; राज्यभरात तीव्र पडसाद

वाघमारेंच्या या विधानामुळे मराठा समाजाला टार्गेट करण्यासाठी थेट महिलांचा अपमान झाल्याची भावना निर्माण झाली आणि राज्यभरात संतापाची लाट उसळली. जालना येथील कदीम पोलीस ठाण्यात मराठा समाज बांधवांनी वाघमारे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तक्रार दाखल केली. दोन समाजांत तेढ निर्माण करणे आणि महिलांच्या लज्जेस धक्का पोहोचेल असे वक्तव्य केल्याप्रकरणी वाघमारेंवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.

नांदेडमध्ये ‘सकल मराठा समाजाच्या’ महिलांनी मोठा मोर्चा काढून वाघमारेंच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला होता. तर सोलापूरच्या माढ्यातही त्यांच्याविरोधात जोरदार निदर्शने झाली.

वाढत्या वादानंतर वाघमारेंकडून माफीनामा

राज्यभरातून होणारा कडाडून विरोध आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर नवनाथ वाघमारे यांनी बॅकफूटवर जात माफी मागितली आहे. “बावनकुळेंवर मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ओघात माझ्याकडून हे वक्तव्य गेले. यापूर्वी माझ्याकडून असे कधीही विधान गेले नाही. राज्यातील भगिनींनी मला समजून घ्यावे आणि पदरात घ्यावे,” असा खेद त्यांनी व्यक्त केला.

Check Also

व्यापार व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल व्यापारी बांधवांचा गौरव

हिंगोली, दि 08 हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने व्यापार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या …