17/08/26
Breaking News

भाजपच्या केंद्रीय संघटनेत महाराष्ट्रातून तीन नेत्यांना मोठी जबाबदारी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. नव्या नियुक्त्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत. भाजपच्या केंद्रीय संघटनेत महाराष्ट्राला यावेळी महत्त्वाचे स्थान मिळाले असून, अनेक नेत्यांवर राष्ट्रीय पातळीवरील जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

नव्या नियुक्त्यांमध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत, राम माधव, बैजयंत जय पांडा, डी. पुरंदेश्वरी यांच्यासह एकूण 13 नेत्यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून डॉ. भारती प्रवीण पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्रासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तावडे यांच्यासह सुनील बन्सल, बिप्लब कुमार देब, स्मृती इराणी, डॉ. सतीश पूनिया, गजेंद्र पटेल, हरीश द्विवेदी आणि संजय भाटिया यांचाही राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून समावेश करण्यात आला आहे.

संघटनात्मक पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावणारे बी. एल. संतोष यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) पद कायम ठेवण्यात आले आहे. शिवप्रकाश आणि सौदान सिंह यांची राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस (संघटन) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रीय सचिवांच्या यादीतही महाराष्ट्राचा सहभाग

भाजपच्या राष्ट्रीय सचिवांच्या नव्या यादीत कविता पाटीदार, के. सुरेंद्रन, डॉ. भोला सिंह, डॉ. प्रदीप वर्मा, जगदीश ईश्वरभाई पटेल, डॉ. संदीप पाठक, फांगनॉन कोन्याक, संगीता यादव, अनिल अँटोनी, डॉ. एम. व्यंकटेशन, मनोज तिग्गा, सिद्धार्थ शंभू, डॉ. स्वदेश सिंह, मृगांक देव बर्मन, रोहन गुप्ता आणि जय प्रकाश यांचा समावेश आहे.

या यादीत महाराष्ट्रातील नेत्याला राष्ट्रीय सचिवपद देण्यात आलेले नसले तरी, राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची जबाबदारी पीयूष गोयल यांच्याकडे देण्यात आली आहे. राजस्थानचे राजेश मंगल यांची राष्ट्रीय संयुक्त कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्रीय कार्यालयाची जबाबदारीही निश्चित

भाजपच्या केंद्रीय कार्यालयाशी संबंधित जबाबदाऱ्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत. तरुण चुघ यांच्याकडे केंद्रीय कार्यालय प्रभारीपद सोपवण्यात आले आहे, तर महेंद्र पांडे यांची केंद्रीय कार्यालय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Check Also

बँक खात्यांतील तफावतीबाबत काळजी करू नका, कृषीमंत्र्यांनी दिली माहीती

राज्यातील ज्या शेतकऱ्यांची थकबाकी 2 लाख रुपयांच्या आत आहे, त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार …