पूर्णा (सुशिल दळवी) : ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण निवासी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेला पूर्णा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी शनिवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली नवोदय प्रवेश परीक्षा तालुक्यातील तीन परीक्षा केंद्रांवर अत्यंत नियोजनबद्ध व शांततापूर्ण वातावरणात संपन्न झाली. या परीक्षेसाठी एकूण १४२४ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी तब्बल १३४१ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित राहिले, तर ८३ विद्यार्थी अनुपस्थित राहिले.
तीन केंद्रांवर १४२४ विद्यार्थ्यांची परीक्षा
पूर्णा तालुक्यात नवोदय परीक्षेसाठी तीन परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये अभिनव विद्या विहार, पूर्णा येथे ५०४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होते. त्यापैकी ४७९ विद्यार्थी उपस्थित राहिले, तर २५ विद्यार्थी अनुपस्थित होते. विद्याप्रसारणी सभेचे हायस्कूल, पूर्णा येथे ५०४ विद्यार्थ्यांपैकी ४७४ विद्यार्थी उपस्थित राहिले व ३० विद्यार्थी अनुपस्थित होते. तसेच गुरु बुद्धस्वामी महाविद्यालय, पूर्णा येथे ४१६ विद्यार्थ्यांपैकी ३८८ विद्यार्थी उपस्थित राहिले, तर २८ विद्यार्थी अनुपस्थित होते.
या तीनही केंद्रांवर सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या वेळेत परीक्षा घेण्यात आली. परीक्षार्थींना वेळेत केंद्रावर उपस्थित राहता यावे, यासाठी शिक्षण विभागाने पूर्वनियोजन केले होते.
केंद्र संचालकांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा व्यवस्था
अभिनव विद्या विहार, पूर्णा येथील परीक्षा केंद्राची जबाबदारी रमेश सूर्यवंशी यांनी केंद्र संचालक म्हणून सांभाळली. विद्याप्रसारणी सभेचे हायस्कूल, पूर्णा येथे बुच्चलवार सर, तर गुरु बुद्धस्वामी महाविद्यालय, पूर्णा येथे. मिटकरी यांनी केंद्र संचालक म्हणून काम पाहिले. तिन्ही केंद्रांवर आवश्यक बैठक व्यवस्था, परीक्षा साहित्य, पर्यवेक्षण व प्रशासकीय समन्वय यांचे नियोजन करण्यात आले होते.
बैठ्या पथकाच्या दक्षतेमुळे परीक्षा प्रक्रिया सुरळीत
परीक्षा पारदर्शक, निर्भय व नियमानुसार पार पडावी, यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने प्रत्येक केंद्रावर बैठे पथक नियुक्त करण्यात आले होते. या पथकामध्ये .संजय कांबळे, .राजू पांचाळ, .शिवाजी लोखंडे, .राजेश फुलवले, वैजनाथ कोरडे निलेश स्वामी, बालाजी केंद्रे व जीवन खांडेकर यांनी जबाबदारीने कामकाज पार पाडले. परीक्षा प्रक्रियेवर लक्ष ठेवणे, आवश्यक समन्वय साधणे व प्रशासकीय बाबींची पूर्तता करणे यामध्ये बैठे पथकाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.
शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ.सविता बिरगे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी
परीक्षेच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद परभणीच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ सविता बिरगे यांनी तिन्ही परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी परीक्षा व्यवस्थेची पाहणी करून संबंधितांना आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच गटशिक्षणाधिकारी श्री.किरण सुरडवार, विस्तार अधिकारी श्री.बालाजी कापशीकर, केंद्रप्रमुख श्री. सुंदर धवन व विभाग प्रमुख व्यंकटरमण जाधव यांनीही विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन परीक्षा कामकाजाचा आढावा घेतला.
शिक्षण विभागाच्या समन्वयातून यशस्वी नियोजन
संपूर्ण परीक्षेचे नियोजन पंचायत समिती पूर्णा येथील शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले होते. गटशिक्षणाधिकारी श्री. किरण सुरडवार, गटशिक्षणाधिकारी बालाजी विठ्ठलराव कापशीकर व विभाग प्रमुख व्यंकटरमण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा नियोजनाची अंमलबजावणी करण्यात आली. केंद्र संचालक, बैठे पथक, शिक्षक, कर्मचारी व शिक्षण विभागातील अधिकारी यांनी परस्पर समन्वयातून आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.
१४२४ पैकी १३४१ विद्यार्थ्यांची उपस्थिती
पूर्णा तालुक्यातील तीनही परीक्षा केंद्रांवर मिळून १४२४ विद्यार्थ्यांपैकी १३४१ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित राहिले. एकूण उपस्थितीचे प्रमाण सुमारे ९४.१७ टक्के इतके आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या परीक्षेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शिक्षण विभागाने केलेले नियोजन, केंद्र संचालकांची दक्षता, बैठे पथकाचे सहकार्य आणि सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचा समन्वय यामुळे परीक्षा प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.
पूर्णा तालुक्यात नवोदय प्रवेश परीक्षेचे नियोजन यशस्वीरीत्या पार पडल्याने शिक्षण विभागातील अधिकारी, केंद्र संचालक, बैठे पथकातील सदस्य, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com