गंगाखेड,दि 28
गंगाखेड शहरातील कुंभार समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी (दफनभूमी) उपलब्ध नसल्याने अंत्यविधीच्या वेळी समाजबांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संतोष त्रिंबकराव मुरकुटे यांनी कुंभार समाजासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गंगाखेड परिसरातील सर्व्हे क्रमांक १०९ मध्ये काही शासकीय जमीन शिल्लक असून, ती जागा कुंभार समाजाच्या स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून देता येणे शक्य असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात यापूर्वी शासनाकडे शिफारस करण्यात आली होती. तसेच भूमी अभिलेख कार्यालयाकडून जागेच्या मोजणीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला असून, संबंधित कार्यालयाने मोजणी करून अहवालही सादर केला आहे.
विशेष म्हणजे, जागेची मोजणी व संबंधित प्रक्रिया पूर्ण होऊनही समाजाला अद्याप हक्काची स्मशानभूमी मिळालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणात आणखी विलंब न करता सर्व्हे क्रमांक १०९ मधील उपलब्ध शासकीय जागा कुंभार समाजासाठी हस्तांतरित करावी, अशी आग्रही मागणी संतोष मुरकुटे यांनी केली आहे.
निवेदनासोबत जागेच्या मोजणीसंदर्भातील पत्र, कुंभार समाजाची मागणी तसेच भूमी अभिलेख कार्यालयाशी संबंधित कागदपत्रेही सादर करण्यात आली आहेत. आता प्रशासन या मागणीची किती गांभीर्याने दखल घेते आणि कुंभार समाजाला हक्काची स्मशानभूमी कधी उपलब्ध करून देते, याकडे समाजबांधवांचे लक्ष लागले आहे.
Shabdraj www.shabdraj.com