17/08/26
Breaking News

तुम्ही आमच्या पिढ्या उध्वस्त करायच्या आणि त्याला आम्ही विकास म्हणायचं का? राजू शेट्टी यांचा घणाघाती हल्ला

 

वसमत,दि 17
मूठभर भांडवलदारांना खुष करण्यासाठी प्रास्तावित असलेला शक्तीपीठ हा फक्त महामार्ग नाही, तर हा आमच्या शेतकऱ्यांच्या मरणाचा हायवे आहे. तुम्हाला जायचं असेल, तर हवेतून जा. समुद्रावरून पूल बांधा. पण आमच्या शेतातून, आमच्या घरातून जाणार असाल, तर आधी आमच्या छातीवरून जावं लागेल. कारण आम्हाला तुमचे आठ पदरी रस्ते नकोत, तर आम्हाला आमच्या दोन वेळेच्या भाकरीसाठी आमची हक्काची दोन एकर जमीन हवी आहे. पण हा तुमचा कोणता विकास आहे? आमच्या सुपीक जमिनींवरून बुलडोझर चालवायचा, आणि तुम्ही आमच्या पिढ्यान् पिढ्यांच्या वाड्या-वस्त्या उध्वस्त करायच्या आणि त्याला आम्ही विकास म्हणायचं का? असा घणाघात माजी खासदार तथा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर केला.

प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा, हळदीच्या दरातील लुट थांबावी आणि ऊसाला उच्चांकी व योग्य दर मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी मौजे.हट्टा येथील सिद्धेश्वर मंदिरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित एल्गार परिषद सामूहिक निर्धाराने पार पडली. याप्रसंगी उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रस्तावित महामार्गामुळे शेती, शेतकरी, ग्रामजीवन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच महामार्गाच्या विरोधातील लढा अधिक व्यापक आणि संघटित करण्याचा निर्धारही उपस्थितांनी व्यक्त केला.

पुढे राजू शेट्टी म्हणाले की, आमच्या सुपीक जमिनी कापून, आमची घरं उध्वस्त करून, आमच्या पिढ्यान् पिढ्यांची वसाहत नष्ट करून कोणता विकास साधणार आहात तुम्ही? हा महामार्ग म्हणजे विकास नाही, हा शेतकऱ्यांच्या मरणाचा राजमार्ग आहे! आम्हाला रस्ते नकोत, आम्हाला आमची शेती हवी आहे! आमच्या जमिनीवर बुलडोझर चालवण्यापूर्वी आमच्या छातीवरून जावं लागेल, हे सरकारने लक्षात ठेवावं. तसेच हिंगोलीची हळद म्हणजे जगभरात नाव असलेलं पिवळं सोनं आहे. पण या सोन्याची लूट कोण करतंय? बाजारात मक्तेदारी करून व्यापारी आमच्या मालाची किंमत ठरवतात आणि आम्ही शेतकरी हात चोळत बसतो. आम्ही रक्ताचं पाणी करून पिकवतो आणि तुम्ही आम्हाला कवडीमोल दर देता? ही लूट आता बंद झाली पाहिजे.

आमचा ऊस गळीताला जातो तेव्हा कारखानदार नफा कमवतात, पण उसाचा दर ठरवताना मात्र आम्हालाच रांगेत उभं करतात. वर्षानुवर्षे एफआरपीच्या नावाखाली आम्हाला फसवलं जातंय. उसाला उत्पादन खर्चापेक्षा दीडपट दर द्या आणि तोही वेळेत द्या. कारण आमच्या मुलांच्या शिक्षणाची फी, घराचा खर्च आम्ही कशातून करायचा? त्यासाठी माझ्या शेतकरी बांधवांनों, तुम्ही एकटे असाल, तर तुम्हाला कुणी विचारणार नाही. पण एकजूट झाली तर सरकारलाही झुकावं लागेल. म्हणून आपल्या हक्कासाठी, आपल्या मातीच्या अस्मितेसाठी एकजुटीने लढूया, असेही आवाहन राजू शेट्टी यांनी केले.

याप्रसंगी हिंगोली जिल्हा शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा शेतकरी नेते संदीप माटेगावकर यांनी प्रास्ताविकातून सरकारच्या धोरणांवर रोखठोक भाष्य केले. आज इथे आपण कोणत्याही पक्षाच्या झेंड्याखाली जमा झालो नाही, तर आपल्या हक्कासाठी, आपल्या मातीच्या लेकरांसाठी, आणि आपल्या घामाच्या किमतीसाठी जमा झालो आहोत. त्यामुळे शेतकऱ्याचा आवाज, शेतकऱ्याचा हक्क ही घोषणा फक्त बॅनरवर राहू नये म्हणून हा एल्गार आहे. लक्षात ठेवा, आपण कोणाकडे भीक मागत नाही. तर आपल्या हक्काची मागणी करतोय. गेली कित्येक वर्षे आम्ही सहन केलंय. आता पाणी नाकापर्यंत आलं आहे. सरकारच्या घोषणा आणि वास्तव यातली दरी आता आम्हाला सहन होत नाही. त्यामुळे शेतकरी जर पेटून उठला, तर दिल्लीचे तख्तही हलतात. म्हणून हा एल्गार फक्त हिंगोलीचा नाही, तर हा महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याचा आवाज आहे. त्यामुळे शक्तीपीठ रद्द, हळदीला भाव, उसाला दर या मान्य केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही.

दरम्यान, शक्तीपीठ महामार्गाच्या प्रश्नावर आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक भूमिका घेत असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले. सरकारच्या विकासाच्या संकल्पनेला विरोध नसला, तरी विकासाची किंमत शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी आणि ग्रामीण अस्तित्वाच्या विनाशातून मोजली जाऊ नये, ही या बैठकीची मध्यवर्ती भूमिका ठरली. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलन आगामी काळात कोणते स्वरूप धारण करते आणि सरकार त्यावर काय भूमिका घेते, याकडे जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

या एल्गार परिषदेस गिरीश फोंडे, किशोर ढगे, राजन क्षीरसागर, माधुरी क्षीरसागर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, संदीप माटेगावकर, हनुमंत राजेगोरे, तानाजी भोसले, नवनाथ कुर्हे, ॲड.ऋषिकेश देशमुख, जुनेद पठाण, गोरख चव्हाण, पप्पू जाधव, डॉ.अजय मुंदडा, पुष्पक देशमुख, रावसाहेब अडकिने यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट क्रमांक १

…म्हणून हा एल्गार थांबणार नाही!

गेली ८० वर्षे आम्ही फक्त आश्वासनं ऐकली. शेतकरी राजा म्हणणाऱ्या या व्यवस्थेने आम्हाला कर्जबाजारी, आत्महत्याग्रस्त आणि रस्त्यावरचा भिकारी करून ठेवलं. आम्ही अन्न पिकवतो म्हणून देशाचं पोट भरतं, पण आमच्या घरात मात्र दोन वेळचं अन्न शिजत नाही. ही विसंगती आता संपली पाहिजे. कारण आमची सहनशीलता संपली आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्द, हळदीची साठेबाजी थांबली पाहिजे आणि उसाला रास्त भाव मिळावा या मागण्या मान्य केल्याशिवाय हा एल्गार थांबणार नसल्याचे शेतकरी नेते संदीप माटेगावकर यांनी आवर्जून स्पष्ट केले.

Check Also

गंगाखेड येथे ईद-उल-अजहा भक्तीभवाने व उत्साहाने साजरी

गंगाखेड प्रतिनिधी शहरात ईद-उल-अजहा (बकरी ईद) हा पवित्र सण मोठ्या उत्साहात,धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक सलोख्याच्या …