कसे मिळवाल डिजिटल प्रॉपर्टी कार्ड, जाणून घ्या प्रक्रिया…
मिळकत पत्रिका काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला bhulekh.mahabhumi.gov.in असं सर्च करावं लागेल.
त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.
या वेबसाईटवर उजवीकडे तुम्हाला Digitally Signed 7/12 किंवा ‘डिजिटल स्वाक्षरीत सातबारा पाहण्यासाठी इथं क्लिक करा’ हा पर्याय दिसेल.
त्यावर क्लिक केलं की एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. DOWNLOAD FACILITY FOR DIGITALLY SIGNED 7/12, 8A AND PROPERTY CARD – असं या पेजचं शीर्षक आहे.
प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला या पेजवर लॉग-इन करायचं आहे. सातबारा काढताना वापरलेलं युजरनेम आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग-इन करू शकता. पण, जर तो लक्षात नसेल तर फोन नंबर टाकूनही तुम्ही प्रॉपर्टी कार्ड पाहू शकता.
ते कसं तर त्यासाठी OTP Based Login या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर Enter Mobile Numberच्या खालच्या रकान्यात तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मग Send OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे. एकदा का तुम्ही या पर्यायावर क्लिक केलं की, OTP sent on your mobile असा मेसेज तिथं येईल.
याचा अर्थ तुमच्या मोबाईलवर एक OTP म्हणजेच One Time Password म्हणजेच काही आकडे पाठवलेले असतात, ते जसेच्या तसे तुम्हाला Enter OTPच्या खालच्या रकान्यात टाकायचे आहेत. त्यानंतर Verify OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
पुढे तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर Digitally signed 7/12, Digitally signed 8A, Digitally signed eFerfar, Digitally signed Property card, Recharge Account, Payment History, Payment Status असे वेगवेगळे पर्याय दिसतील. यातल्या Digitally signed Property card या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
त्यानंतर ‘डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड’ नावाचं एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये सुरुवातीला तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे, त्यानंतर जिल्हा, भूमी अभिलेख कार्यालय आणि गाव निवडायचं आहे.
गाव निवडलं की Property card fee for this village: Rs 45. असा मेसेज स्क्रीनवर येईल. याचा अर्थ या गावातील प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी 45 रुपये इतकं शुल्क आकारलं जाईल. या मेसेजखालच्या ओके या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
मग CTS नंबर टाकायचा आहे. CTS म्हणजे सिटी सर्व्हे नंबर. याचा अर्थ जमीन ओळखण्यासाठी सरकारी रेकॉर्डमध्ये नोंदवलेला एक नंबर. प्रॉपर्टीशी संबंधित सगळे रेकॉर्ड या नंबरशी संबंधित असतात. त्यानंतर CTS नंबर निवडा या पर्यायावर क्लिक केलं की तो नंबर तिथं आलेला दिसेल. त्या नंबरवर क्लिक करून तो निवडायचा आहे.
आता रिचार्ज अकाऊंट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. डिजिटल सहीचं प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी आधी 45 रुपये आपल्याला खात्यात जमा करावे लागणार आहे.
रिचार्ज अकाऊंट या पर्यायावर क्लिक केलं की MAKE ONLINE PAYMENT नावाचं एक नवीन पेज तुम्हाला दिसेल. इथं Enter Amount समोर 45 इतका आकडा टाकायचा आहे आणि मग पे नाऊ यावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर रिफंड पॉलिसीसंदर्भातल्या पेजवरील कन्फमया पर्यायावर क्लिक करायचं आहे.
पुढे तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा भीम यूपीआय वापरून पैसे जमा करू शकता. मी माझ्या एटीएम कार्डावरील माहिती टाकून पे नाऊ म्हटलं आहे.
त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी पाठवला जाईल. तो इथं टाकून सबमिट म्हणायचं आहे. त्यानंतर पेमेंट सक्सेस झाल्याचा मेसेज स्क्रीनवर येईल. इथल्या कंटिन्यू या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
आता तुम्हाला पुन्हा माहिती भरायची आहे. विभाग, जिल्हा, भूमी अभिलेख कार्यालय, गाव आणि CTS नंबर निवडायचा आहे. ही माहिती भरून झाली की खाली 45 रुपये जमा असल्याचं तुम्हाला दिसेल. मग डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर प्रॉपर्टी कार्ड डाऊनलोड होईल.