रस्त्यात अडवून पत्रकाराला लुटण्याचा प्रयत्न

0 3

परभणी – जिंतूर रोडवरील रायगड कॉर्नर येथे उतरल्यानंतर पेडगाव रस्त्यावरून इनायत नगरकडे जात असलेल्या एका पत्रकाराला थांबवून मोबाईल आणि पैशांची मागणी करत थापडबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना 1 सप्टेंबर रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

 

सोमनाथ स्वामी यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे इनायत नगरकडे जात असताना डि. एड. महाविद्यालयाच्या मैदानावर काही इसम थांबले होते. त्यांनी अचानक स्वामी यांना एकटे जात असताना पाहून त्यांना घेरले व मोबाईल, पैशांची मागणी करत मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी त्यांच्या ओळखीतील दोघेजण त्याच रस्त्याने जात होते. त्यांनी यांची त्या अनोळखी लोकांच्या तावडीतून सुटका केली. सदर प्रकरणी अनोळखींवर कोतवाली पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

 

पोलिसांची गस्त वाढविण्याची नागरीकांची मागणी
अशा घटना रोज होत असल्याने परिसरातील नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुना पेडगाव लगत असलेल्या डि.एड. कॉलेजची इमारत ही सद्यस्थितीत मोडकळीस आलेली आहे. याच इमारतीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकांचा वावर वाढला आहे. यात सकाळी आठ वाजल्यापासून गांजा, दारूडे, तर रात्री पार्ट्या होत आहेत. तसेच याच इमारतीत अश्‍लिल प्रकारही मोठया प्रमाणात घडत परिसरातील नागरिकांतून बोलले जात आहे. तेथील वॉचमन जीवाच्या भितीपोटी त्यांना हटकत नाही. या प्रकाराचा परिसरातील नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच जुनापेडगाव रस्त्यावर मोठया प्रमाणात खाजगी शिकवणी चालतात. परिसरात विद्यार्थींनींची छेड काढल्याच्या घटनाही मोठया प्रमाणात घडत आहेत. पोलिस प्रशासनाने या बाबीकडे गांभिर्याने लक्ष घालण्याची मागणी नागरीकांतून होत आहे.

error: Content is protected !!