छत्रपती शिवरायांमुळे स्वातंत्र्याची पहाट शिल्लक आहे-सौरभ करडे
सेलू / नारायण पाटील – देश ,देव आणि धर्म रक्षणासाठी छ.शिवाजी महाराजांनी आपल्या सकल सुखाचा त्याग केला.ते भोगी नव्हे तर श्रीमंत योगी होते असे म्हणाले. मुघल व परकीय आक्रमकांच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध शौर्याने लढा देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केल्यामुळे आज स्वातंत्र्याची पहाट शिल्लक असून आपण हिंदू म्हणून जिवंत आहोत असे प्रतिपादन शिवकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक सौरभ करडे यांनी येथील एका व्याख्यान कार्यक्रमात केले.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाईची विवेकानंद प्राथमिक विद्यालय सेलू च्या वतीने मागील ११ वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या स्व.जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेचे हे १२ वे वर्ष आहे त्यातील दुसरे पुष्प गुंफताना छ.शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या .वर्ष पूर्ती निमित्ताने सेलू येथे दि.४ फेब्रुवारी रोजी आयोजित स्व.जनुभाऊ रानडे यांच्या स्मृती व्याख्यानमालेत
” शिवरायांचा आठवावा प्रताप ” या विषयावरील व्याख्यानात त्यांनी वरील प्रतिपादन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह मा.हेमंतजी वैद्य हे होते.तर व्यासपीठावर संयोजक श्री. उपेंद्र बेल्लूरकर व हरिभाऊ चौधरी यांची उपस्थिती होती.
नूतन विद्यालयाच्या रा.ब गिल्डा सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाला.प्रारंभी स्वामी विवेकानंद विद्यालयातील कु.शालवी सावरगावकर आणि विद्यार्थीनी समूहाने स्वागत गीत सादर केले. गौतम सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केल्यानंतर करूणा कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला .शंतनू पाठक यांनी समर्पक वैयक्तिक पद्य गायिले
सौरभ करडे यांनी आपल्या घणाघाती ,आवेशपूर्ण भाषणात उपस्थित श्रोत्यांच्या वारंवार टाळ्या घेत छ.शिवाजी महाराजांच्या ३६ वर्षाच्या कारकीर्दीतील सुक्ष्म नियोजन व अभ्यासपूर्ण रणनितीचा रोमांचकारी इतिहास सांगत जिजाऊंचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करून शौर्याचा इतिहास निर्माण केल्याचे सांगितले. शिवाजी महाराजांवर बालपणातच जिजाऊंची रामायण, महाभारत, व संतांच्या संस्कारांतून देश,धर्म व त्यागाची शिकवण देत देशभक्तीचा पीळ निर्माण केला.मुघल सत्तेने अपवित्र केलेली भूमि सोन्याच्या नांगराने पवित्र केली.या कार्याच्या अनुषंगानेच उपस्थित माता भगिनींनी जिजाऊंची आदर्श घेऊन सशक्त व सबल व्हावे असे आवाहन करत .लव्ह जिहाद सारख्या कट कारस्थानापासून दक्ष व सुरक्षित राहण्यास सांगितले.तर शिवाजी महाराजांच्या राज्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत असेही आवाहन केले.आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात श्रीराम,श्रीकृष्ण संत तुकाराम, ज्ञानेश्वर,भारतरत्न अटलजी,व राष्ट्र पुरूषांच्या प्रेरक चरित्राच्या इतिहासाची चर्चा करून श्रोत्यांमध्ये आवेश जागृत केला.संपूर्ण वंदेमातरम गीत गात व शिवाजी महाराजांच्या त्रिवार जयघोषात आपल्या भाषणाची सांगता केली.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह श्री.हेमंतजी वैद्य यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संघ प्रचारक स्व.जनुभाऊ रानडे यांच्या समर्पित सेवा कार्याचा वारसा संस्थेने समाजकार्य व शिक्षणाबरोबर नाळ जोडत पुढे नेण्याचा संकल्प या व्याख्यानमालेतील केल्याचे सांगितले .
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन श्री.विजय चौधरी यांनी केले तर शेवटी कार्यवाह श्री.उपेंद्र बेल्लूरकर यांनी सर्वांचे आभार मानले तर कु.कल्याणी पाठकसह गर्दीने उपस्थित महिला पुरूष श्रोत्यांनी सामुहिक पसायदान गायिले.व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी प्रायोजक देवगिरी बँकेचे व्यवस्थापक श्री विश्वास देव व कर्मचारी,विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक शंकर शितोळे व शिक्षक वृंद,आणि संयोजन समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.व्याख्यानास परिसरातील परगावच्या श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती.