मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये खलबतं,राजकीय वर्तुळात चर्चेला उधान

0 76

शब्दराज ऑनलाईन,दि 20 ः
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. या बैठकीत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी राजकीय चर्चा केल्याची माहीती समोर येत आहे. सोमवारी सह्याद्री अतिथिगृहात या दोन्ही नेत्यांची भेटही झाली होती. मात्र त्यावेळी उपस्थित असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे राजकीय संवाद साधता आला नाही. त्यामुळे आज ही भेट झाल्याचं बोललं जातंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात जवळपास अर्धातास चर्चा झाली.

महाविकास आघाडीतील अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ खडसे, भावना गवळी अशा नेत्यांच्या मागे सध्या सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीचे शुल्ककाष्ट लागलेले आहे. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, आता या यंत्रणांना न घाबरता त्यांच्याविरोधात एकत्रितपणे लढा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी घेतला आहे. त्याबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
यावेळी शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बारामतीमधील innovation scientific research institute च्या उदघाटन सोहळ्याचं निमंत्रणही दिलं. या संस्थेचं उद्धघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच करण्यात येणार आहे. त्याची कार्यक्रम पत्रिका देण्यासाठीही शरद पवार मुख्यमंत्री यांना भेटायला गेले होते.

दोन दिवसांपूर्वीही शररद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एक बैठक झाली होती. त्या बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानानबाबत शेतकऱ्यांना मदत, कोविड निर्बंध हटविण्याच्या संदर्भात चर्चा तसेच कोविडमुळे संकटात आलेल्या अवजड वाहतूकदारांना दिलासा देण्यासाठी अवजड वाहनांवरील वाहतूक कर कमी करण्याच्या संदर्भात चर्चा झाली होती.

सकाळी विनायक राऊतांनी घेतली होती गडकरींची भेट

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आज सकाळीच दिल्लीत नितीन गडकरींची भेट घेतली. नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी कोकणातील प्रलंबित रस्ते आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या संबंदित प्रश्नांवर चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे.

error: Content is protected !!