आर्थिक क्रांतीच्या काळात संशोधकांनी नवीन प्रवाहावर काम करावे-अधिष्ठाता डॉ.डी.एम.खंदारे यांचे मत यांचे मत
श्री शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
परभणी – एकविसावे शतक प्रचंड आर्थिक क्रांतीचे ठरत आहे. खाजगीकरण आणि उदारीकरणाच्या काळात आर्थिक उन्नतीसाठी नवीन प्रवाह निर्माण झाले आहेत. अशावेळी संशोधकांनी या प्रवाहांचा शोध घेऊन संशोधन करून समाजोपयोगी कार्य करावे असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.डी.एम.खंदारे यांनी श्री शिवाजी महाविद्यालयात शनिवारी (दि.३०) रोजी आयोजित चर्चासत्रात केले.
वाणिज्य आणि अर्थशास्त्र विभागाच्या वतीने “वाणिज्य-अर्थशास्त्रातील नवीन प्रवाह” या विषयावर ऑनलाईन पध्दतीने आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ.उत्कर्ष किट्टेकर, समन्वयक डॉ.एम.एस.परतूरकर, डॉ.दिगंबर रोडे यांची उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना डॉ.खंदारे पुढे म्हणाले, नवीन कौशल्य शिकल्याने नवनवीन दालन निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमावर भर दिला आहे त्याचा फायदा येणाऱ्या पिढीला होईल असेही ते म्हणाले. यावेळी आपल्या भाषणात प्राचार्य डॉ.जाधव म्हणाले, विद्यार्थ्यांनी अद्ययावत ज्ञान प्राप्त करीत उद्योजकतेकडे वळावे. स्वयंरोजगार निर्माण करून नौकरी देणारे व्हावे. आर्थिक उन्नतीसाठी सेवा क्षेत्रात ही अनेक संध्या उपलब्ध आहेत. या संधीचा फायदा घेऊन स्वतःचे करिअर घडवावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी डॉ.विकास दीप, डॉ.दिलीप चव्हाण, डॉ.श्रीनिवास केशट्टी, डॉ.रोहिदास नितोंडे, डॉ.दिगंबर रोडे आदींनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.एम.एस.परतूरकर, सूत्रसंचालन डॉ.नरेंद्र मुदिराज तर आभार प्रदर्शन डॉ. गणेश चलींदरवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.डी.बी.तांदूळजेकर, डॉ. भारत नागरगोजे, प्रा. सुजाता चव्हाण, प्रा. ऐश्वर्या डावरे, प्रा. गजानन कोरडे, डॉ.रुपेश देशमुख, डॉ.प्रवीण धापसे, प्रा.लक्ष्मीकांत रासवे, प्रा.गोपाळ परांडे आदींनी पुढाकार घेतला.