भक्तीतुन मिळे मनःशांती – मनाचे श्‍लोक (भाग 38)

0 219

जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे
जयाचेनि योगे समाधान बाणे
तयालागि हे सर्व चांचल्य दीजे
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥39॥
अर्थ: वेद शास्त्र पुराणे ज्याचे गुणगान करतात आणि ज्याच्यामुळे तुला सुख समाधान, शांति मिळणार आहे त्या श्रीरामाकडे तू तुझ्या चिंता, काळज्या, उलाघाल आणि त्यापायी होणारी चंचलता भक्तिपूर्वक सोडून दे. आणि हे मना, त्या राघवावर विश्‍वास ठेवून त्याच्या आसर्‍याला जा.
सज्जनगडावर दोन वर्षे राहून समर्थ शिवथरघळीत आले. तिथे त्यांनी समर्थ संप्रदायाचा श्रीमद दासबोध हा प्रधान ग्रंथ लिहिला. या ग्रंथात समर्थांनी प्रपंच, राजकारण, संघटन, व्यवस्थापन, व्यवहारचातुर्य, व्यक्तिमत्त्व विकास, सभ्यता आणि शिष्टाचार या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केला आहे. दासबोधातील मूर्खलक्षणे वाचत असताना तर अनेकांना वाटते की, समर्थांनी आपला स्वभाव अचूकपणे कसा ओळखला? जगातील अनेक भाषांमध्ये दासबोधाचा अनुवाद झाला आहे.
समर्थ रामदास स्वामी श्रीरामांची महती सांगत आहेत…
राघव, श्रीराम, रघुराज, रामचंद्र ही सारी नावे समर्थ एक ‘परमेश्‍वर’ या अर्थी वापरतात हे मागे स्पष्ट झाले आहेच. त्यामुळे श्रीराम हा अवतार जो वेद, पुराणे, शास्त्रे इत्यादी वाङ्मय निर्माण झाल्यानंतर घडला त्याचे गुणवर्णन हे देवाचे, परमेश्‍वराचे गुणवर्णन अशा स्वरूपात चार वेद, अठरा पुराणे आणि अठरा शास्त्रे यांच्यामध्ये आहे.
तेव्हा अशा ज्या परमेश्‍वराचे गुणवर्णन या प्रचंड वाङ्मयात पदोपदी केले गेले आहे त्याच्या भक्तीमुळेच या विश्‍वात समाधान ही प्रवृत्ती मनात निर्माण होते आणि तिथे बाणवून रहाते.
शहंशहा नावाच्या शायराने मनाच्या चंचलतेचे असे वर्णन केले आहे:
बालक मन और वानरा,कबहुं न रे निचंत ।
बाल और वानर सोत है, यह सोवत में भी उडन्त ॥
अर्थ:बालक मन व वानर हे कधीच चुपचाप बसत नाही. बालक व वानर झोपल्यास चुपचाप राहतात पण मन हे झोपेतच उड्डाण भरते.
चांचल्य हा एक या श्‍लोकामधला महत्वाचा शब्द आहे .चांचल्य म्हणजे अस्थिरता. पण ती कशी तर एखाद्या छोट्या मुलाच्या हालचाली मधे असते तशी .उथळ आणि अवखळ .विचारां मुळे अस्वस्थता असणं वेगळं आणि विचार नसल्याने येणारी अस्थिरता म्हणजे चांचल्य .क्षणात हे तर क्षणात ते ही ती स्थिती .विचार आणि कृती मधील सारे चांचल्य ईश्‍वराला देऊन टाक .
आपला हा चांचल्याचा पसारा बरोबर घेऊनच राघवा घरी रहायला जाऊ या .सतत त्याच्या अनुसंधानात राहू या .कधीतरी नक्कीच स्थिरता येईल . असे समर्थ समजावत आहेत.
समाधान फक्त मिळणेच नाही तर अंगी बाणवून राहणे हे चिरशांतीप्राप्तीचे निदर्शक आहे. तेव्हा अशा समाधान, चिरशांतीसाठी तू त्या परमेश्‍वराला अनन्यभावे शरण जाऊन, त्याच्यावर दृढ विश्‍वास ठेवून आपल्या सार्‍या विवंचना, काळज्या, घालमेली, मनाची चंचलता या गोष्टी, त्यांचा शम होण्यासाठी, ‘इदं न मम’ म्हणून त्याला अर्पण कर आणि त्याच्या भक्तीत रममाण होऊन रहा.
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
ज्योती कुलकर्णी, मुंबई

error: Content is protected !!