मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील शनिवारी परभणीत; किशोर रणेर यांची माहिती

0 31

परभणी / प्रतिनिधी – मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे हे शनिवारी (दि.20) जिल्हा दौर्‍यावर येणार असून मानवत तालुक्यातील यशवाडी, पालम, पुर्णा तालुक्यातील गौर, आलेगाव सवराते या ठिकाणी संवाद बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती परभणी जिल्हा सकल मराठा समाज समन्वयक किशोर रणेर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

जिल्हा पोलीस प्रशासनाने निवडणुक आचारसंहितेचे कारण दाखवून परवानगी नाकारत आयोजकांना कलम 149 नुसार नोटीसा बाजवल्या होत्या. त्याविरोधात गुरूवारी (दि.18) उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल केलेल्या रिट याचिकेवर आज सुनावणी होवून संवाद बैठकांना परवानगी मिळाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

 

या दौर्‍यात श्री.जरांगे हे काही गावांमध्ये आत्महत्याग्रस्त मराठा कुटुंबांची भेट घेणार आहेत. शनिवारी (दि.20) सकाळी 10 वा.मानवत तालुक्यातील यशवाडी येथे संवाद बैठक होणार आहे. त्यानंतर श्री.जरांगे यांचे पेडगाव येथे दुपारी 1 वाजता स्वागत होणार असून पुढे आर्वी येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबाला ते भेटणार आहेत. टाकळी, नागापूर, सनपुरी, करडगाव, नांदखेडा येथे ते भेट देणार आहेत.

 

 

परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील एका दुकानाचे उद्घाटन श्री.जरांगे यांच्या हस्ते दुपारी 2 वा.होणार आहे. त्यानंतर कात्नेश्वर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला ते भेट देणार आहेत. दुपारी वसमत तालुक्यातील आरळ येथे ते जाणार असून पुर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथे आयोजित यात्रोत्सवास ते हजेरी लावणार आहेत. आलेगाव सवराते व गौर येथे संवाद बैठक होणार आहे. पालम येथे संध्याकाळी 7 वाजता संवाद बैठकीचे आयोजन केले आहे. त्यानंतर ते नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे रवाना होतील.
अ‍ॅड.श्रावण बहिरट व अ‍ॅड.वैभव पवार यांच्यामार्फत खंडपीठात रिट दाखल केली होती. त्यावर तातडीने सुनावणी घेण्यात आली, असे किशोर रणेर यांनी सांगितले.

error: Content is protected !!