मराठी पत्रकार संघा तर्फे जिंतूरकरांना ” काव्यमैफिल”ची मेजवानी

0 33

शेख वाजीद
जिंतुर,दि 11 ः
जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनाचे औचित्य साधून रविवार 15 जानेवारी रोजी सायंकाळी 05 वाजता शहरातील जुनी मुन्सफी येथे जिंतूरकरांची साहित्यिक भूक भागविण्यासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम कवींची “काव्यमैफिल” आयोजित करण्यात आली आहे. सदरील काव्यमैफिलीचा आस्वाद घेण्याकरिता साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम हाती घेऊन समाज प्रबोधनाचे कार्य पार पाडण्यात येत असते. सोबतच दरवर्षी दर्पण दिनाचे औचित्य साधून भव्य सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असते. याही वर्षी दर्पण दिनाचे औचित्य साधून जिंतूरकरांची साहित्यिक भूक भागविण्यासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम कवींची “काव्यमैफिल” आयोजित करण्यात आली आहे. या काव्यमैफिलीस ख्वाडा, बबन, छत्रपती शासन, लॅंड 1857, राजकुमार यासारख्या मराठी चित्रपटात गीत लेखन करणारे कवी, संगीतकार, लेखक, कथाकार प्रा डॉ विनायक पवार तसेच ‘मित्र वनव्यामध्ये गरव्या सारखा’ कवितेचे प्रसिद्ध कवि अनंत राऊत आणि साम टीव्ही मराठीच्या वृत्त निवेदिका तथा प्रसिद्ध कवयित्री यामिनी दळवी हजेरी लावणार आहे. या तिन्ही कवींच्या बहारदार आणि समाज प्रबोधनपर कवितांच्या सदरीकरणामुळे काव्यमैफिलीची संध्या चांगलीच रंगणार आहे. या काव्यमैफिलीचा आस्वाद घेण्याकरिता शहर व परिसरातील साहित्यप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष पठाण शहेजाद खान, कार्याध्यक्ष गुणिरत्न वाकोडे, सचिव रामप्रसाद कंठाळे तसेच पदाधिकारी, सल्लागार, मार्गदर्शक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!