मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ दाव्याची राष्ट्रवादीच्या खासदार आमदारांकडून पोलखोल

0 33

 

परभणी, प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथरी तालुक्यातील 40 सरपंचांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केल्याचा दावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी आपल्या सोशल मीडियावरील अधिकृत पेजवरून केलेला आहे. मात्र हा दावा साफ खोटा असून प्रवेश केलेल्यांमधील एकजण वगळता राष्ट्रवादीचे सर्व सरपंच पक्षाशी एकनिष्ठ आहेत, अशी माहिती खासदार फौजिया खान (fauzia khan) व आमदार बाबाजानी दुर्राणी (babajani durrani) यांनी आज रविवारी (दि.22) परभणी येथे पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादी भवनात झालेल्या या पत्रकार परिषदेला खासदार डॉ.फौजिया खान, माजी आमदार विजयराव गव्हाणे, पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते, तहेसिन खान, तालुका अध्यक्ष संतोष देशमुख, सुमंत वाघ आदी उपस्थित होते.

आ.दुर्राणी म्हणाले की, परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्राबल्य असून स्थानिक स्वराज्य संस्था या दोन पक्षाच्याच ताब्यात आहेत. महाविकास आघाडीची मोठी ताकद असून भाजपचे जिह्यात अस्तित्व नाही. यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने शिंदे – फडणवीस सरकार विरोधी पक्षातील माणसे फोडण्याचे काम करीत आहे. यामुळेच मुंबईप्रमाणेच खोक्यांचे राजकारण सरपंच मंडळी पर्यंत येवून ठेपले आहे. तुम्ही आमच्या पक्षात प्रवेश करा, तुमच्या ग्रामपंचायतीला विकासासाठी मोठा निधी देवू असे आश्वासन देत सरपंच मंडळीना फोन करण्यात आल्याचा आरोप आ.दुर्राणी यांनी यावेळी केला. गंभीर गुन्ह्यातील काही आरोपीदेखील मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत फोटो काढत असल्याचे दिसत आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी कुणालाही आपल्या पक्षात प्रवेश देताना त्याचे चारित्र्य, पार्श्वभूमी पाहून शहानिशा करून घ्यावी, असा सल्ला देखील दुर्राणी यांनी दिला आहे. पाथरी तालुक्यातील केवळ चार सरपंच शिंदे गटात गेले असून त्यातील केवळ चाटेपिंपळगावचा 1 सरपंच तेवढा राष्ट्रवादीचा होता, असेही ते म्हणाले. खासदार श्रीमती खान म्हणाल्या की, महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकार हे दडपशाही व प्रलोभन या दोन मार्गांचा वापर करून दुसऱ्या पक्षातील माणसे फोडण्याचे काम करीत आहे. इडीमध्ये अडकलेले, जेलमध्ये राहून बेलवर सुटलेले आरोपी देखील ते पक्षात घेत आहेत. भावना गवळी यांच्या विरोधात देखील ईडीने कारवाई केली होती म्हणूनच त्यांनी पक्षांतर केल्याचे खा.खान यांनी सांगितले.

विजयराव गव्हाणे म्हणाले की, जी माणसे शिंदे गटाच्या पक्षात गेलेली नाहीत, कार्यक्रमाला हजर नाहीत अशांची नावे वापरून राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी करण्यात येत असून संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी असे मत श्री गव्हाणे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी पाथरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सरपंच आपल्यासोबत असून ते पत्र परिषदेच्या वेळी तिथे हजर असल्याचा दावा करण्यात आला. यातील काही जणांनी आपल्याला आमिष दाखवून पक्ष प्रवेशासाठी फोन आल्याचे सांगितले.

error: Content is protected !!