वसमत रोडवरील अनेक नगरातील वीज रात्रभर गुल; नागरिक त्रस्त

0 97

परभणी (२९) शहरातील वसमत रोडवरील रामकृष्णनगर, भाग्यलक्ष्मी नगर, एकता कॉलनी, जागृती कॉलनी आदी भागातील मागील आठ दिवसांपासून रात्री तसेच दिवसातून अनेकदा विजेचा लपंडाव सुरू तर आहेच तसेच सतत कमी दाबामुळे येत असलेल्या विजेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
मागील आठ दिवसांपासून जोराच्या वाऱ्यासह पाऊस आला की वीज गायब होते, रोहित्रावरून रात्री अपरात्री सतत जाणारे फ्युज आणि कमी दाबाने वीज येत असल्याने इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. रविवारच्या रात्री रामकृष्ण नगरमधील एक फ्युज तब्बल दुसऱ्या दिवशी दुरुस्त होते यावरून महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कसा आहे हे दिसून येते. वाऱ्यामुळे ताराला तार चिटकून सतत फ्युज जायचे प्रकार होत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. या समस्येची सूचना नागरिक फोनद्वारे महावितरणला कळवीत असतात पण त्याचा काहीही परिणाम होताना दिसत नाही. दोन दिवसांपूर्वी महावितरणचे दोन प्रमुख अधिकारी सदरील भागाची पाहणी करून गेले परंतु ही नुसती पाहणीच होती कार्यवाही नाही झाली अशी माहिती नागरिकांनी दिली.
सदरील भागातील वीज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ३३ केव्ही केंद्रातून जोडलेली आहे. विद्यापीठ परिसरात अवकाळी वारा-पाऊस आला की झाडांमुळे विजेचे तार एकमेकांना लागून विजेच्या प्रवाहात तांत्रिक अडचण निर्माण होऊन या केंद्रावरून होणारा वीज पुरवठा बंद केला जातो. कधी कधी रात्रभर वीज जाते. अवकाळी पाऊस सुरू झाला की हा विजेचा लपंडाव सुरू होतो. या दरवर्षी होणाऱ्या आणि सततच्या त्रासाला रामकृष्णवासीयांना सामना करावा लागत आहे.
अनेक वर्षांपासून या नगरात होणारा वीज पुरवठा कृषी विद्यापीठातून बंद करून स्वतंत्रपणे सुरू करावा अशी मागणी आहे परंतु याकडे महावितरण नेहमीच दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सदरील नगरातील वीज ग्राहक नियमित वीज बिल भरणा करणारे आहेत. नियमित वीज बिल भरून सततच्या विजेच्या अनियमित त्रासाला नागरिक कंटाळले आहेत. या समस्येचे लवकर निराकरण करून नागरिकांना होणारा त्रास कमी करावा अशी मागणी नागरिकांनी केले आहे.

error: Content is protected !!