परभणी जिल्ह्यातील कुणबी नोंदीची फेरतपासणी..विभागीय आयुक्तांचे आदेश

0 195

परभणी,दि.18 : मराठा समाजातील पात्र व्यक्तींना मराठा कुणबी व कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी शासनाने न्यायमूर्ती (निवृत्त) संदीप शिंदे समिती स्थापन केली आहे. सदर समिती हि प्रत्येक जिल्ह्यात सापडलेल्या नोंदीचा वेळोवेळी आढावा घेत आहे. परभणी जिल्ह्यात सापडलेल्या कुणबी नोंदी कमी असून, सर्व संबंधीत विभागानी पुन्हा काळजीपूर्वक नोंदीची फेरतपासणी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज मराठा कुणबी व कुणबी मराठा प्रमाणपत्र विषयक आढावा बैठकीत विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड बोलत होते. यावेळी विभागीय उपायुक्त जगदिश मिणियार, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी श्री. आर्दड म्हणाले की, परभणी जिल्ह्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना मराठा कुणबी व कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याकरीता कुणबी जातीच्या नोंदीच्या कागदपत्रे आवश्यक आहे. परंतू परभणी जिल्ह्यात कुणबी नोंदी तपासणीचे कामे व्यवस्थित होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच आतापर्यंत ज्या सापडलेल्या कुणबी नोंदी आहेत त्या अत्यंत कमी आहे. याकरीता जिल्हा विभाजनामुळे परभणी जिल्ह्यातील जे तालूके हिंगोली किंवा जालना जिल्ह्यात समाविष्ठ झाली आहेत त्याठिकाणची सन 1967 पुर्वीची सर्व कागदपत्रे तपासावीत.

परभणी, सेलु जिंतूर, गंगाखेड, पुर्णा, पालम, पाथरी, मानवत आणि सोपपेठ या 9 तालूक्यात कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत. यात परभणी तालुक्यातील 206, सेलू तालुक्यात 361, जिंतुर तालुक्यात 598, गंगाखेड तालूक्यात 56, पुर्णा तालूक्यात 176, पालम तालूक्यात 181, पाथरी तालूक्यात 608, मानवत तालूक्यात 586 आणि सोनपेठ तालूक्यात 116 या 9 तालूक्यात एकुण 2 हजार 288 नोंदी आढळून आल्या आहे. परंतू जिल्ह्यात यापेक्षा ही जास्त नोंदी असण्याची शक्यता आहे. याकरीता नोंदीची फेरतपासणी करावी. प्रत्येक संबंधीत विभागाने त्यांच्या कार्यालयात उपलब्ध नोंदीचे प्रत्येक पान पुन्हा काळजीपूर्वक तपासावे. तसेच संबंधीतांनी 100 टक्के नोंदीची तपासणी केल्याचे प्रमाणपत्र सादर करावीत. या कामात दिरंगाई किंवा दूर्लक्ष केल्यास किंवा शोधणार नसाल तर विभागीय आयुक्त कार्यालयाचे पथक पाठवून तपासणी केली जाईल. आणि त्यानंतर ही त्यात नोंदी आढळल्यास संबंधीतास कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा सूचना ही विभागीय आयुक्त आर्दड बैठकीत दिल्या.

यावेळी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना मराठा कुणबी व कुणबी मराठा प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. बैठकीस यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, जिवराज डापकर, शैलेश लाहोटी, जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख वसंत निकम, जिपचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सिकर यांच्यासह सर्व तहसिलदार आणि विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!