पुरातन वस्तूंच्या संवर्धनासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा -प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांचे प्रतिपादन

श्री शिवाजी महाविद्यालयात नाणे-टपाल तिकिटे प्रदर्शन

0 95

 

परभणी,दि 27 (प्रतिनिधी)ः
मोबाईल क्रांतीने विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडीत बदल होत आहेत. विविध छंदही जोपासणे लोप पावत आहेत. अशावेळी पुरातन वस्तूंच्या संवर्धनासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांनी केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने श्री शिवाजी महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने शनिवार (दि.२७) रोजी पुरातन नाणे आणि टपाल तिकिटे प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रोहिदास नितोंडे, इतिहास विभाग प्रमुख डॉ.परिमल सुतवणे, नाणे संकलक धनंजय मुलगीर, डॉ.जयंत बोबडे, डॉ. लक्ष्मीकांत जिरेवाड आदींची उपस्थिती होती.
उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.जाधव पुढे म्हणाले, वीस वर्षांपूर्वी वेगवेगळे छंद जोपासले जायचे. आज मात्र ते होताना दिसत नाही. यामुळे पुरातन वस्तूंचे जतन होत नाही. पुरातन वस्तू ह्या आपला ऐतिहासिक ठेवा आहे तो जतन करणे आपले कर्तव्य आहे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सदरील प्रदर्शनात १९४७ पासूनचे नाणे आणि टपाल तिकिटे विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. त्यात धनंजय मुलगीर यांनी जतन करून ठेवलेले निजामकालीन नाणे, संत,वैज्ञानिक, विचारवंत, थोर सेनानी आदींच्या संदर्भातील तिकिटांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रवीण कदम, प्रास्ताविक डॉ.लक्ष्मीकांत जिरेवाड तर आभार प्रदर्शन डॉ.परिमल सुतवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.पी.जे.नादरे, प्रा.पल्लवी कुलकर्णी, सय्यद सादिक आदींनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!