मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांना मोठा दिलासा,वॉरंट रद्द
पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना मोठा दिलासा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातील वॉरंट रद्द करण्यात आले आहे. तसेच वॉरंट रद्द करताना कोर्टाने त्यांना 500 रुपयाचा दंड देखील ठोठावला आहे. एक जामीनदार द्यायला सांगितला आहे. 2013 मध्ये एका फसवणुकीच्या गुन्ह्यात जरांगेंविरोधात वॉरंट जारी झालं होतं. त्यानंतर जरांगे आज कोर्टात हजर झाले. मी न्यायालयाचा आदर करतो, न्याय सर्वांसाठी समान आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी कोर्टात जाण्याअगोदर दिली होती.
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे पुणे न्यायालयामध्ये दुपारी 12 वाजता पोहचले. न्यायालयाने त्यांना 2013 साली कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीचा गुन्ह्यामध्ये वॉरंट बजावले होते. त्यानंतर ते न्यायालयासमोर न्यायालयात हजर झाले. त्यावेळी जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, न्यायालयाच्या समोर सर्व समान आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी मी न्यायालयात हजर झालो आहे. याविषयी अधिक बोलणे योग्य होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेने 2013 साली एका नाटकाचे आयोजन केले होते. या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर त्याचे पैसे देण्यात आलेले नव्हते असा आरोप आहे. याप्रकरणी न्यायालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार कलम 156 (3) प्रमाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये जरांगे पाटील यांना अटकपूर्व जामीन देखील मिळालेला होता. याच प्रकरणात त्यांना आता न्यायालयाने वॉरंट बजावले होते. त्याच प्रकरणात आज सुनावणी झाली आहे.