भयानक.. तरुणीला जेसीबीने जमिनीत गाडण्याचा प्रयत्न

0 346

 राजगड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंढावळे खुर्द येथे जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याने एका २१ वर्षीय तरुणीला जेसीबीच्या सहाय्याने शेतात गाडण्याचा प्रयत्न केला. या घटनेनं एकच खळबळ उडाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. प्रणाली बबन खोपडे (२१) असे त्या तरुणीचे नाव असून त्या तरुणीची आई कमल बबन खोपडे यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरोधात 307 कलमअंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे.
संभाजी खोपडे, तानाजी खोपडे, बाळू भोरकर, उमेश जयस्वाल या चार जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न, शिवीगाळ धमकावणे यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरूणी कोंढवळे गावातील असून तिला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पीडित तरूणी आणि तिच्या आईने केला. न्यायप्रविष्ट असलेल्या जमीनीचा बेकायदेशीररित्या ताबा घेण्यासाठी आलेल्या लोकांना त्या तरूणीने रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने तिच्या अंगावर माती टाकली आणि तिला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करण्यात आला आहे.

या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ते नागरिक पोलिसांसह जमिनीचा ताबा घेण्यासाठी आले असता, तरूणीचा त्यांच्याशी वाद झाला. त्यानंतर पोलिसांसमोरच ही घटना घडली. व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमध्ये ती तरूणी कंबरेपर्यंत मातीत गाडली गेल्याचेही दिसत आहे. अखेर तिच्या कुटुंबियांनी मदतीसाठी धाव घेत तिला बाहेर काढले. याप्रकरणानंतर तरूणीने वेल्हा पोलीस स्टेशनंमध्ये रीतसर तक्रार केली आहे. त्यानंतर राजगड पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसंच, या प्रकरणात 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल होऊ शकतो.

तुम्हाला सगळ्यांना गाडून टाकू, आरोपींनी दिली धमकी

आम्ही शेतात काम करत होते, तेव्हा तिथे १० -१२ गुंड आले होते. त्यांनी शेतात घुसायचा प्रयत्न केला, तेव्हा आम्ही त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांच्या ट्रॅक्टरच्या समोर जाऊन उभे राहिलो, पण त्यांनी आम्हाला तेथून जबरदस्तीने बाजूला ढकललं. त्यानंतर त्यांनी माझ्या बहिणीलाही बाजूला ढकलून दिलं आणि तिच्या संपूर्ण अंगावर माती टाकून दिली. काहीच दिसत नव्हतं. नंतर एका व्यक्तीने तिच्या तोंडावरची माती काढली, मग ती आम्हाला दिसली आणि तिचा आवाज ऐकून तिथे धाव घेतली. ती जमीनीत गाडली गेली होती. तिला कसंबसं आम्ही बाहेर काढलं, असा भयानक अनुभव पीडित तरूणीच्या बहिणीने सांगितला.  ही जमीन तुम्हाला देणार नाही, काय करायचं ते करा. इथे तुम्हाला सगळ्यांना गाडून टाकून, अशी धमकी त्या गुंडानी दिली, असेही तिने सांगितलं.

error: Content is protected !!