गैरसमजाचा फटका..जोशी सरांनीच सांगितले होत कारण..

0 36

: शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची प्राणज्योत आज पहाटे मालवली. हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. नगरसेवक ते लोकसभेचे सभापती अशी त्यांची राजकीय कारकिर्द राहिली. ते राज्याचे पहिले बिगरकाँग्रेसी मुख्यमंत्री होते. बाळासाहेबांचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्याकडे पक्षात कोणतीही जबाबदारी नव्हती.

१९९५ मध्ये जोशी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. १९९९ मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना पदाचा राजीनामा देण्यास सांगितला. जोशींनी पक्ष नेतृत्त्वाचा शिरसावंद्य मानला. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची सत्ता गेली. १९९९ मध्ये जोशी यांना सेनेनं लोकसभेचं तिकीट दिलं. जोशी यांनी निवडणूक जिंकली. ते खासदार झाले. २००२ ते २००४ या कालावधीत ते लोकसभेचे सभापती होते.
२००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. २००९ मध्ये ते लोकसभा लढवण्यास उत्सुक होते. पण पक्षानं त्यांना उमेदवारी दिली नाही. २००४ मध्ये झालेल्या पराभवानंतर पक्षानं त्यांना राज्यसभेवर संधी दिली. पण त्यांना दुसरी टर्म देण्यात आली नाही. त्यांच्या ऐवजी अनिल देसाईंची वर्णी लागली. या कालावधीत जोशी सरांचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये शिवसेनेची पिछेहाट झाली. जोशी स्वत: लोकसभा निवडणूक हरले. विधानसभा निवडणुकीत दादर पट्ट्यात सेनेला धक्के बसले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेनं दादरमधलं सेनेचं वर्चस्व मोडून काढलं.
बाळासाहेब ठाकरेंचं नोव्हेंबर २०१२ मध्ये निधन झालं. त्यानंतर झालेल्या दसरा मेळाव्यात मनोहर जोशींना दुर्दैवी प्रकाराला सामोरं जावं लागलं. जोशी व्यासपीठावर जाताच शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या. त्यामुळे दुखावलेल्या जोशींनी व्यासपीठ सोडण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही.
मु्ख्यमंत्रिपद सोडण्याचा निर्णय आणि दसरा मेळाव्यात घडलेला प्रकार, दोन्ही गोष्टी गैरसमजातून घडल्याचं जोशींनी लोकसत्ता वृत्तपत्राच्या कार्यक्रमात सांगितलं होतं. ‘१९९९ मध्ये अशाच एका गैरसमजातून मुख्यमंत्रिपद गेलं. माझ्या जागी नारायण राणे मुख्यमंत्री झाले. जो पद देतो, त्याला ते काढण्याचा अधिकार असतो. बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केलं तेव्हा का केलं असं विचारलं नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचे आदेश त्यांनी दिले तेव्हा का असा प्रश्न मी केला नाही. लगेच राजीनामा दिला. १९९५ मध्ये मुख्यमंत्रिपद मिळावं यासाठी मी आणि सुधीर जोशी दोघेही बाळासाहेबांना भेटलो होतो. साहेबांनी मला पसंती दिली. प्रेयसीला आपण विचारतो का, माझ्यावरच का प्रेम केलं?’, असं जोशी म्हणाले होते.
बाळासाहेबांचं माझ्यावर नितांत प्रेम होतं. त्यामुळेच शिवसेनेतील सर्व पदं मला मिळाली. उद्धव ठाकरेंचंही माझ्यावर प्रेम आहे. वडील आणि मुलाच्या प्रेमाच्या पद्धतीत फरक असू शकतो. संवादात काही कमतरता असू शकते. त्यामुळे दसरा मेळाव्यातही गैरसमजाचा फटका बसल्यानंतरही मी सारं काही माफ करू शकलो, असं जोशींनी सांगितलं होतं.

error: Content is protected !!