मान्सूनच्या परतीच्या पावसाची चाहूल ‘या’ तारखेपासून मान्सून थांबणार

0 72

मुंबई, 27 सप्टेंबर : मान्सूनच्या परतीच्या पावसाची चाहूल लागली आहे. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान राज्यातील मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान असल्याने काल(दि.26) दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती. तर आज (ता. 27) उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

उत्तर पंजाब आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या प्रणालीपासून बिहार पर्यंत हवेचा कमी दाबाचा पूर्व पश्चिम पट्टा सक्रिय आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून4.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. दरम्यान 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान परतीचा पाऊस थांबण्याची शक्यता आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पाऊस सुरू असून, उस्मानाबाद, बीड, लातूर, नगर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. 27) उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मान्सून परतीसाठी पोषक हवामान

मान्सूनने वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू केला असून, मागच्या आठवड्यात राजस्थानच्या खाजूवाला, बिकानेर, जोधपूर, आणि गुजरातच्या नालिया पर्यंतच्या भागातून मान्सून परतला आहे. त्यानंतर परतीच्या प्रवासात कोणतीही वाटचाल झालेली नसून, सोमवारी (ता. 26) मान्सूनच्या परतीची सीमा कायम होती. परतीसाठी पोषक हवामान झाल्याने येत्या दोन ते तीन दिवसांत वायव्य आणि मध्य भारताच्या काही भागातून मान्सून परत जाण्याची शक्यता आहे. विजांसह पावसाचा येलो अलर्ट धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या भागात देण्यात आला आहे.

यंदाच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका

राज्यात जून महिन्यात पावसानं उघडीप दिली होती. मात्र, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसानं राज्यात धुमाकूळ घातला होता. तसेच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला देखील राज्यात चांगल्या पावसानं हजेरी लावली होती. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. काही ठिकाणी तर अतवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

error: Content is protected !!