पालकांनो, लस द्या बाळा, गोवर आजाराला टाळा

0 104

 राज्यात सध्या गोवर-रुबेलाचा उद्रेक होत असून, आतापर्यंत गोवर आजाराचे शंभरावर रुग्ण आढळून आले आहेतत्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग यावर मात करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून गुरुवारपासून (दि. 15) जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून, पालकांनी गोवर प्रतिबंधक लस देऊन पाल्यांचे संरक्षण करण्यासाठी पुढे यावे….

 

shabdraj add offer

राज्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे महानगरपालिकेसह वसई-विरार, भिवंडी, मिरा-भाईंदर आणि ठाणे जिल्हा, खान्देशातील धुळे, मालेगाव, जळगाव, मराठवाड्यातील औरंगाबाद, विदर्भातील बुलडाणा आणि कोकणातील पनवेल, रायगड, आणि पिंपरी-चिंचवड मनपा आदी भागात गोवरचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. त्यामुळे परभणी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, जिल्ह्यात याचा प्रसार होऊ नये यासाठी पालकांनी नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील बालकाला लस द्यावी. कारण राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने परभणीसह मराठवाड्यातील चार जिल्हे हे लसीकरणाअभावी जास्त धोका असलेल्या गटात (High Risk) घोषित केले आहेत. ही विशेष लसीकरण मोहीम 25 डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वरील वयोगटातील प्रत्येक पात्र बालकाला गोवर प्रतिबंधक देण्यासाठी पालकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.

जिल्ह्यांचे वर्गीकरण

       सद्यस्थितीत उच्च, मध्यम आणि कमी धोका पातळी असे राज्यातील जिल्ह्यांचे वर्गीकरण करण्यात आले असून, उच्च गटात मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी आणि नांदेडशिवाय धुळे, जळगाव, कोल्हापूर, मुंबईसह उपनगर, नाशिक, पुणे आणि ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. मध्यम गटात अहमदनगर, अकोला, बीड, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, हिंगोली, लातूर, नागपूर, नंदुरबार, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, वाशिम आणि यवतमाळ तर कमी धोका असलेल्या गटात अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, उस्मानाबाद, पालघर, रायगड आणि वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे. याचाच अर्थ मराठवाड्यातील एकही जिल्हा कमी धोका असलेल्या जिल्ह्यांमध्ये समाविष्ट नाही. त्यामुळे पालकांनी पाल्यांना विशेष लसीकरण मोहिमेदरम्यान गोवरची लस देणे अत्यंत आवश्यक आहे.

लक्षणे

सौम्य लक्षणे सर्दी, ताप, खोकला, लाल रंगाचे पुरळ येणे आरोग्याची गुंतागुंत, निमोनिया, अतिसार, अंधत्व, मतिमंदत्व, डोळे लाल होणे, अशक्तपणा, अंग दुखणे ही गोवराची तर आजारामुळे गर्भावस्थेच्या काळात संक्रमणामुळे नवजात बाळ जन्मजात दोषासह जन्माला येऊ शकते. त्यात आंधळेपणा, बहिरेपणा, जन्मजात हृदयाचे आजार हे रुबेलाची लक्षणे आहेत. त्यामुळे अशा प्रकारची लक्षणे असल्यास पालकांनी पाल्यांचे तात्काळ योग्य उपचार करून घ्यावेत.

  डिसेंबर 2023 पर्यंत गोवर-रुबेला निर्मूलन करावयाचे असून 15 ते 25 डिसेंबर 2022 आणि 15 ते 25 जानेवारी 2023 असा दोन्ही विशेष लसीकरण मोहिमांचा कालावधी आहे. गोवर उद्रेकाची व्याप्ती मर्यादित ठेवून रुग्णसंख्या आणि मृत्यूवर नियंत्रण राखणे, सामूहिक प्रतिकारशक्ती वाढविणे, प्रबोधनातून नागरिकांचा सहभाग वाढविणे आवश्यक असून ऑक्टोबर 2022 पासून आतापर्यंत एक लाख 60 हजार बालकांना ही लस दिली आहे.

गोवर प्रतिबंधासाठी हॉट स्पॉट निश्चिती, ताप-पुरळ सर्वेक्षण, विशेष लसीकरण मोहीम, विभागीय शीघ्र प्रतिसाद पथक, कुपोषित मुलांची विशेष काळजी घेणे, प्रयोगशाळा जाळ्यांचा विस्तार, सामाजिक प्रबोधन आणि लोकसहभाग वाढविणे, आंतरविभागीय समन्वय वाढविणे, स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल आणि संदर्भ सेवा, मृत्यू तपासणी संशोधनविषयक नियोजनाचा समावेश आहे. तसेच सामाजिक प्रबोधन, आरोग्य शिक्षण आणि लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

सर्वेक्षणासाठी यांची घेणार मदत

साथीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी सर्वेक्षण करण्यासाठी स्थानिक आशा, अंगणवाडी सेविका, स्थानिक आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवकांची मदत घेऊन त्यांची यादी तयार करून ती आंतरविभागीय समन्वयाने अद्ययावत ठेवण्यात येईल. लाभार्थी संख्या व क्षेत्रानुसार अतिरिक्त लसीकरण सत्राचे नियोजन करण्यात येईल. निश्चित आणि संभाव्य उद्रेक असणारे भाग तसेच मागील तीन वर्षात 95 टक्केपेक्षा कमी लसीकरण झालेले, कुपोषित आणि लोकसंख्येची घनता जास्त असलेले तसेच अल्पसंख्यक आणि वंचित समाजाची वस्ती असणारे आणि लसीकरणाला विरोध करणारे भाग याआधारे हॉटस्पॉट निश्चित करण्यात येत आहेत.

विभागीय शीघ्र प्रतिसाद पथकांची स्थापना

त्यासाठी विभागीय शीघ्र प्रतिसाद पथके स्थापन करण्यात येत असून, त्यामध्ये वैद्यकीय, हिवताप  सहायक संचालक, विभागातील एक जिल्हा सर्वेक्षण अधिकारी, एक आरसीएच अधिकारी, एक साथ रोग तज्ज्ञ, एक जिल्हा माहिती अधिकारी, एस एम ओ, एन पीएस पी, सर्व्हिलीयन्स को-ऑर्डिनेटर आणि एका युनिसेफच्या प्रतिनिधीचा समावेश आहे. तर आंतर विभागीय समन्वय समितीमध्ये नगर विकास आणि नगर प्रशासन, महिला व बालकल्याण विभाग, ग्रामविकास, अल्पसंख्याक कल्याण, शालेय शिक्षण आणि माहिती व जनसंपर्क विभागाचा समावेश आहे. त्यामुळे ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व पालकांनी पुढाकार घेत आपल्या पाल्याचे आरोग्य सुरक्षित करावे.

*****

प्रभाकर बारहाते,

माहिती अधिकारी, परभणी

error: Content is protected !!