सर्वात मोठी बातमी…अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम; भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब?

0 1,145

काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी… राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अशोक चव्हाण यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

अशोक चव्हाण यांच्या पत्रात काय?

मी दिनांक 12 फेबुवारी 2024 मध्यान्हानंतरपासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याद्वारे सादर करीत आहे, धन्यवाद, असं अशोक चव्हाण यांनी या पत्रात म्हटलं आहे.

 अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली. या दोघांमध्य झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप उघड झालेला नाही. परंतु, या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

आगामी राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, असा जाणकारांचा होरा आहे. भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. नांदेडच्या राजकीय वर्तुळातही अशोक चव्हाण मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अनेक कार्यकर्ते  आणि पदाधिकाऱ्यांनी ‘भावी खासदार’ असा उल्लेख करत अशोक चव्हाणांचे स्टेटस ठेवले आहेत.

अशोक चव्हाणांचा मोबाईल नॉट रिचेबल

अशोक चव्हाण यांचा मोबाईल फोन सध्या नॉट रिचेबल आहे. त्यामुळे नांदेड काँग्रेसच्या वर्तुळात कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. गेल्या बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जातील, अशी चर्चा होती. राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतरही अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात सरकारने निधी दिला होता. याशिवाय, बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याचा विचार करत होते, अशी चर्चा होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर बहुमत चाचणीवेळी मविआचे काही आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. भाजपला मदत करण्याासाठीच या आमदारांनी बहुमत चाचणीला येणे टाळल्याची चर्चा होती. यामध्ये अशोक चव्हाण यांचा समावेश होता. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी याचा अहवाल मागवून या प्रकाराची गंभीर दखल घेतली होती. या सगळ्या घडामोडींमुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील, अशी अटकळ बांधली जात होती. ही शक्यता अखेर खरी ठरताना दिसत आहे.

अशोक चव्हाण यांच्यासारखा मातब्बर नेता आणि माजी मुख्यमंत्री भाजपच्या गोटात जाणे काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. तर मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यास काँग्रेस पक्ष आणखी खिळखिळा होईल.

error: Content is protected !!