होय… आपण आत्महत्या रोखू शकतो…

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त विशेष लेख

0 156

जगभरात आत्महत्या हा एक गंभीर प्रश्‍न आहे. सध्या जगभरात त्याची प्रकरणे चिंताजनक वेगाने वाढत आहेत. अशा परिस्थितीत, या गंभीर समस्येबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन (WSPD) साजरा केला जातो. त्यानिमित्त परभणी येथील प्रसिध्द मानसोपचारतज्ञ डॉ. सुभाष काळे यांनी लिहीलेला विशेष लेख…

 

आत्महत्त्या म्हणजे स्वत:च्या मर्जीने स्वत:चे जीवन संपवणे.
प्रत्येक व्यक्तीला आपला जीव प्रिय असतो. थोडे खरचटले तरी वेदना होतात मग माणूस आत्महत्त्या करून स्वतःचा जीव का घेतो ??
व्यक्तीला जरी त्याचा जीव प्रिय असला तरी आत्महत्त्या करण्याच्यापूर्वी काही दिवसांपासून ती व्यक्ती अशा एखाद्या मानसिक स्थितीतून जात असते की त्या परिस्थितीमुळे तिच्या जीवाला होणारा छळ किंवा समोर आलेले संकट किंवा ताण-तणाव यातून ती निराश, हताश झालेली असते. तिच्या समोर अनेक पर्याय असतात पण त्यावेळेला त्या व्यक्तीस आत्महत्तेशिवाय दुसरा पर्याय सूचत नसतो. आत्महत्या केल्यानंतर ह्या सर्व गोष्टींपासून मी मुक्त होईल अशी त्यांची धारणा असते. मुळात तिच्यासमोरील परिस्थिती कारणीभूत नसून तेव्हा तिच्या मनात येणारे नकारात्मक विचार आत्महत्येस कारणीभूत असतात.

 

 

आत्महत्येची कारणे
1) असफलता. उदा. परीक्षेत नापास होणे किंवा नोकरी न लागणे.
2) घटस्फोट किंवा पती – पत्नीमधील विभक्तता किंवा प्रेमामध्ये ब्रेकअप होणे.
3) कुटूंबातील प्रिय व्यक्तीचा मृत्यू.
4) व्यवसायात झालेले मोठे नूकसान किंवा कर्जबाजारी.
5) काही कारणामुळे जर आपली आपल्या लोकांसमोर बैइज्जती किंवा बदणानामी झाल्यानंतर उदा. बलात्कार सारखी घटना किंवा अवैध गर्भ राहणे किंवा निर्दोष असताना होणारी कोर्टकचेरी, जेल.
6) होणारा छळ उदा. हुंड्यावरून सुनेचा सासरच्या लोकांकडून छळ किंवा नोकरीमध्ये वरिष्ठांकडून छळ.
7) लैंगीक कमजोरी
8) मानसिक आजार
अ) नैराश्य (मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर) यामध्ये व्यक्तीस उदासिनता येते. वेळ जात नाही. कशात मन लागत नाही.
ब) सिझोफ्रेनिया : ह्या आजारामध्ये त्या व्यक्तीस भास होतात. लोक आपल्याबद्दल वाईट बोलत आहेत किंवा आपणाला मारण्याचा कट करत आहेत असे वाटते; तर काही जणांना आजूबाजूला कुणीही नसताना बोलण्याचा आवाज येतो. आणि या सर्व आवाजांना कंटाळून व्यक्ती आत्महत्या करतो; तर कधी ते येणारे आवाज तू आत्महत्या कर असे म्हणतात. कधी सिझोफ्रेनियामध्ये नैराश्य येऊन रुग्ण आत्महत्या करतो.
क) व्यसनाधिनता : उदा. दारूचे व्यसन. यामध्ये व्यसनाधीन व्यक्ती अती सेवनामुळे कधी कधी गोंधळलेल्या अवस्थेत तर कधी अचानक दारू बंद झाल्यामुळे विदड्रावल अवस्थेत आत्महत्या करते.
ड) व्यक्तिमत्व दोष : विचार न करता एकाएकी मनाच्या ऊर्मीने लहरीपणाने वागणारे (इंम्पलसिव्ह); लवकरच चिडणारे; आक्रमक होणारे; जे लोक मानसिक किंवा शरीरिक आजार व्यवस्थितपणे स्वीकारून हाताळण्यात असफल असतात.

 

 

9) शारिरिक आजार
अ) एखादा अपघात होऊन अचानक आलेले अपंगत्व. जर स्वीकारण्यास अडचण येत असेल तर आत्महत्येचे विचार येतात.
ब) वेदणादायक आजार जसे कॅन्सर, एच.आय.व्ही. अशा आजारास रूग्ण कंटाळेला असतो. जवळपास बर्‍याच आत्महत्या करणार्‍या लोकांमध्ये मानसिक आजार दिसून येतात. त्यापैकी बर्‍याच लोकांमध्ये नैराश्य (मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर) तर काही लोकांमध्ये सिझोफ्रेनिया दिसून येतो. बरेच मानसिक आजाराने ग्रस्त आणि परत व्यसनाधिनता यामध्ये देखील आत्महत्येचे प्रमाण दिसून येते. तसेच व्यक्तिमत्वदोष आणि व्यसनाधिनता ह्यामध्ये पण आत्महत्येचे प्रमाण आहे. ज्यांनी अगोदर आत्महत्येचा प्रयत्न केलेला असतो पण असफल झालेला असतो. त्या व्यक्तीमध्ये देखील नंतर आत्महत्या करण्याची दाट शक्यता असते. तसेच अ‍ॅडजेस्टमेन्ट डिसऑर्डर यामध्ये व्यक्ती एखाद्या बिकट परिस्थितीत स्वतःला जुळवून घेऊ शकत नाही त्या परिस्थितीसोबत अ‍ॅडजेस्ट करू शकत नाही.

 

 

* आत्महत्या करण्यापूर्वी त्या व्यक्तिकडून काही गोष्टी कळतात का? जेणे करून त्याला वाचण्यास सोपे जाईल. होय निश्‍चितच…
जवळपास 70 ते 80% आत्महत्या करणारे लोक वेगवेगळ्या पद्धतीने कुणाजवळ तरी थोडे बोलून दाखवतात. जसे माझे जगणे म्हणजे कुटूंबावर किंवा इतरांवर ओझं आहे. किंवा मी माझ्या कुटूंबाकरिता काही करू शकत नाही. तर काहीजण म्हणतात, जगण्यात काही अर्थ राहीलेला नाही. तर काही जण म्हणतात, देवाने लवकर उचललेलं बरं तर कुणी मरणावर गाणे गात किंवा शायरी म्हणत असे. तर काही व्यक्ती स्वतः पश्‍चाताप करून स्वत:वर नफरत करतात. मी दोषी आहे मला जगण्याचा अधिकार नाही असे म्हणतात; तर काही जण सांगतात की मी मेल्यानंतर माझ्या मुलाची अशी काळजी घ्या. तर काहीजन संपत्ती वाटतात तर काही वसीहत लिहितात; तर काही जण एकटे -एकटे बसतात. कुणाशी बोलत नाहीत. चेहर्‍यावर निस्तेज भाव असतात. निराश, होपलेस असतात. काही दीर्घकाळ आजाराने पीडित असतात. आणि म्हणून दाखवतात की अस जगण्यापेक्षा मेलेलं बरं. असे वाक्य कुणी बोलत असेल तर त्याचे गांभिर्य ओळखून त्यांना मदतीची गरज आहे हे समजून घ्यावे आणि त्याच्या इतर नातेवाईकास, मित्रास देखील याची कल्पना द्यावी, दुर्लक्ष करू नये. त्यांना बोलते करावे, त्यांचे सर्व ऐकून घ्यावे. अशा व्यक्तीपासून औषध गोळ्या कीटकनाशक, दोर, किंवा हत्यार, रॉकेल, पेट्रोल दूर ठेवावे आणि त्यांना न समजू देता त्याच्या जवळ कुणीतरी सोबत रहावं. त्यास मनोविकारतज्ञास दाखवून सल्ला तसेच औषधोपचार घ्यावा.
आत्महत्या करणार्‍या व्यक्तीस वाचवण्यासाठी काय करायला पाहिजेत? आत्महत्या करणार्‍या व्यक्तीच्या मनात जास्त प्रमाणात खालील विचार उत्पन्न होतात.

 

 

– जीवन काय आहे? कष्टच कष्ट, त्यापेक्षा मेलेले चांगले, मेल्यानंतर तर सुटका होईल.
– आता माझ्या भविष्यात चांगले काही शिल्लक नाही. अंधकार आहे. आता काहीच होऊ शकत नाही.
– मी का जीवन जगतो? माझी किंमत काय आहे? माझ्या वाचून कुणाचे काही आडत नाही तर मग माझ्या जीवनाचा उपयोग काय ?
– ह्या सर्व समस्या तर मी मेल्यानंतरच जातील.
– या दुनियेला तेव्हाच बरे वाटेल जेव्हा मी मरेल.
– जर माझे कुणी आपले नाही तर मग जीवन जगून फायदा काय ?
– आता जीवन जगण्याचा काही रस्ता शिल्लक नाही ही बेईज्जती मी सहण करू शकत नाही. लोकांना काय तोंड दाखवणार त्यापेक्षा मेलेले बरे. मी तेवढा पापी माणूस आहे.
– आता मला जीवन जगण्याचा काही हक्क नाही.
अशा व्यक्तींसोबत बोला. त्यांच्या भावना समजून घ्या. त्यांना बोलू द्या. त्यांच्या सोबत थांबा. जशा पद्धतीने ते भावना व्यक्त करत असतील जसे रडून किंवा चिडून किंवा शांत राहून त्यांना वेळ द्या. त्यांना विचारा तुला खूप निराश वाटते का? त्यांना विश्‍वास द्या की मी तूला सर्व मदत करेल?

 

त्यांना सांगा की, तू माझ्यासाठी व सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहेस. तू एकटा नाहीस मी तुझ्या सोबत आहे असा धीर द्या. तुझा आता विश्‍वास बसणार नाही पण तुझ्या भावनांमध्ये बदल होईल असे सांगा. मला तुझी खूप काळजी वाटते व तुला मदत करण्याची माझी इच्छा आहे हे पटवून द्या. अशा वेळेस त्याला एकटे सोडू नये. ती वेळ फार महत्त्वाची असते. जर तेव्हा सपोर्ट केला आणि ती वेळ निघून गेली; त्याच्या मनातील भावनांचे वादळ शांत झाले तर तो त्यातून बाहेर येऊ शकतो.

 

जेव्हा तो त्यातून बाहेर येईल तेव्हा त्याच्या समोरील परिस्थिीतीला तोंड देण्यासाठी त्याच्या नियंत्रणातील घटक कोणते? त्याचे विविध पर्याय आपण त्यास दाखवून द्यायला पाहिजे. उदा. एखादा विद्यार्थी नापास झाला असेल व माझे सर्व संपले असे म्हणत असेल, तर त्याच्या नियंत्रणातील घटक म्हणजे तो शिक्षण सोडून व्यवसाय करू शकतो किंवा काही दिवस आराम करून परत अभ्यास करून योग्य मार्गदर्शन घेऊन पुन्हा परीक्षा देऊ शकतो. किंवा ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात काही करू शकतो. त्याच्या विचारांची तीव्रता कमी करण्यासाठी त्याला समजावून सांगा की तो एका परीक्षेत व एवढा मार्कानी एवढ्या विषयात नापास झाला आहेस. त्याचा आपल्या जगण्या मरण्याशी काहीही संबंध नाही. अशिक्षित लोक देखील आनंदाने आरामात जीवन जगत असतात.
आता आपल्या नियंत्रणाबाहेरील घटक म्हणजे, तू नापास झाला आहेस हे पहिले मान्य करावे लागेल. तेव्हा त्याला सांगा की, जगामध्ये बरेच लोक नापास होतात; पण तेच लोक दुसर्‍या क्षेत्रात यशस्वी असतात. तेव्हा याचा जीवन मरणासाठी काहीही संबंध नाही. नंतर अशा व्यक्तीस मानसोपचारतज्ञाकडे नेऊन औषधोपचार किंवा समुपदेशन करून घ्यावे.

डॉ सुभाष काळे मानसोपचार तज्ञ
मन शांती हॉस्पिटल पाथरी रोड परभणी

error: Content is protected !!