अखेर वंचितने आपला पुन्हा उमेदवार बदलला….

0 259

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शरद पवार गटाच्या बारामतीतील उमेदवार सुप्रिया सुळे यांना विरोध करणं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चांगलंच भोवलं आहे. वंचितचे शिरूरचे उमेदवार मंगलदास बांदल यांनी पक्षाच्या बारामतीच्या निर्णयाविरोधात वर्तन केलं. त्यामुळे वंचित आघाडीने त्यांची उमेदवारी रद्द केली आहे. आता त्यांच्या ऐवजी शिरूरमधून वंचित दुसरा उमेदवार देणार आहे. त्यामुळे मंगलदास बांदल यांना मैदानात लढण्यापूर्वीच मोठा झटका बसला आहे. वंचितने ट्विटरवरून याची माहिती दिली आहे.

इंदापूरमध्ये दशरथ मानेंच्या घरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली असता त्या ठिकाणी मंगलदास बांदल हेदेखील उपस्थित होते. त्यावरून वंचितवर मोठी टीका होत होती. त्याची दखल घेऊन वंचितने आता मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय म्हटलंय वंचितने? 

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते.

बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीकडून आतापर्यंत 25 लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर केले होते. त्यापैकी चार उमेदवार वंचितकडून बदलण्यात आले आहेत. रामटेकमध्ये वंचितकडून यापूर्वी शंकर चहांदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र नंतर त्या ठिकाणी काँग्रेसचे अपक्ष बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचितने पूर्वी सुभाष पवार यांना रिंगणात उतरवले होते. यानंतर वंचितने अचानक निर्णय बदलत अभिजित राठोड या तरुण चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अभिजीत राठोड यांचा उमेदवारी अर्जच बाद करण्यात आल्याने वंचितला मोठा धक्का बसला.

error: Content is protected !!