मंत्रीपुत्र राणेंची मालमत्ता सील,पावणे चार कोटींची थकबाकी
: भाजपचे राज्यसभा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र, माजी खासदार निलेश राणे यांना पुणे महापालिकेने दणका दिला आहे. सुप्रसिद्ध आर डेक्कन मॉलमध्ये मिळकत थकवल्या प्रकरणी पालिकेने राणेपुत्राला नोटीस बजावली होती. त्यानंतर आता महापालिकेच्या कर संकलन विभागाने थकित मिळकतीचा भाग सील केला आहे.
संबंधित मिळकतीची सुमारे साडेतीन कोटी रुपयांची थकबाकी होती. पुणे महापालिकेकडून नोटीस बजावूनही हा कर भरला जात नव्हता. त्यामुळे अखेर महापालिकेने तीन मजल्यांच्या मिळकतीचे वरचे दोन मजले सील केले आहेत. मात्र, एरवी एक मिळकत सील केली, तरी मोठा गाजावाजा करणाऱ्या प्रशासनाकडून मात्र ही माहिती गोपनीय ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिकेने नोटीसा दिल्यानंतर प्रत्येक वेळी पालिकेवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप आहे.
महापालिकेकडून मिळकत कराच्या थकबाकी वसुलीसाठी शहरात मोठ्या प्रमाणात मिळकती सील करण्याची कारवाई सुरू आहे. मंत्री महोदयांच्या मिळकतींची थकबाकी असल्याने पालिकेकडून त्यांनाही गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने नोटीसा बजाविण्यात येत होत्या. मात्र, प्रत्येक नोटीसनंतर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात होता. त्यामुळे कोणतीही कारवाई होत नव्हती, असा दावा केला जात आहे.
पाठपुरावा केला पण…
डेक्कन कॉर्नर येथे राणेंच्या मालकीचा मॉल आहे. तीन मजल्यांवरील दुकानांवर थकबाकी होती. त्यात या मॉलची एकूण 5 कोटी 60 लाख रुपये थकबाकी होती. या संदर्भात पुणे महापालिकेने वारंवार पाठपुरावा केला होता. नोटीसदेखील पाठवण्यात आल्या होत्या मात्र तरीही कर भरण्यात आला नाही. त्यामुळे पालिकेने थेट कारवाई करण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांपूर्वी पालिकेने नोटीस बजावल्यानंतर थेट महापालिका आयुक्तांनाच फोन करून कारवाई न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर, पालिकेने कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र, मंगळवारी अखेर पालिकेने या मिळकतीला टाळे ठोकले असून थकबाकीपोटी ती सील करण्यात आली आहे.