16/06/26
Breaking News

अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला तीव्र विरोध,मोर्चातून निषेध नोंदवत मूख्यमंत्र्यांना निवेदन.

सेलू( प्रतिनिधी )
महाराष्ट्र शासनामार्फत अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्याच्या हालचाली सुरू असून त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘अनंत बदर समिती’च्या कार्यपद्धतीबाबत जनतेमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला आहे.या उपवर्गीकरणाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी तालुक्यातील समस्त आंबेडकरी, संविधानप्रेमी नागरिक,सामाजिक संघटना आणि अनुसूचित जातीतील बांधवांच्या वतीने मोर्च्याच्यामाध्यमातून निषेध नोंदवत उपवर्गीकरण रद्द करण्याची मागणी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मूख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे सोमवार १५ जून रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या निवेदनात म्हटले आहे की, संविधानाने अनुसूचित जातींना दिलेल्या एकसंध हक्कांमध्ये विभागणी करून समाजात तेढ, संघर्ष आणि परस्पर अविश्वास निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. अनुसूचित जातीतील ५९ जातींमध्ये भांडणे लावून सामाजिक ऐक्याला तडा देण्याचे काम शासनाने करू नये.आरक्षणाचा मूळ हेतू समाजात फूट पाडणे नसून सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हा आहे.अशा प्रकारच्या उपवर्गीकरणामुळे सामाजिक सलोखा,बंधुता आणि संविधानाच्या समानतेच्या तत्त्वाला बाधा पोहोचू शकते,अशी भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.या निवेदनाद्वारे अनुसूचित जातीचे आरक्षण अ, ब, क, ड उपवर्गीकरण करण्याचा कोणताही निर्णय तात्काळ मागे घ्यावा, उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेली ‘अनंत बदर समिती’ तात्काळ रद्द करावी,अनुसूचित जातीतील ५९ जातींमध्ये संघर्ष व भेद निर्माण करणारे सर्व प्रयत्न थांबवावेत,संविधानाने अनुसूचित जातींना बहाल केलेल्या हक्कांचे संरक्षण करून सामाजिक ऐक्य अबाधित ठेवावे,जातीय जनगणना करावी,नोकरीतील अनुसूचित जातीचा अनुशेष तात्काळ भरण्यात यावा व खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे.”या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा अनुसूचित जाती, आंबेडकरी समाज आणि बहुजन समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण होऊन राज्यव्यापी लोकशाही मार्गाने आंदोलन उभारले जाईल,” असा इशारा ‘धडक मोर्चा’चे आयोजक व समस्त आंबेडकरी समाज बांधव,सेलू यांच्या वतीने देण्यात आला आहे.यासाठी अशोक अंभोरे,भिमराज गोटे,राहूल जाधव,प्रदिप धापसे,रोहन आकात,विनोद धापसे,उत्तम लोखंडे,विलास कांबळे,प्रा.के.डी.वाघमारे,सूरेश रणखांबे, सूधीर सावंत,गोविंद साळवे,महेंद्र दूधवडे,ऋतीक सावंत,आनंद साळवे,सिद्धार्थ सिरसाट,अक्षय साळवे,धारूजी धाबे,काशीनाथ वाघमारे,शिवाजी वाघमारे,पांडूरंग वाढवे सह आदींनी पूढाकार घेतला.

Check Also

 ‘वनामकृवि’ व ‘मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्र’ यांच्यात सामंजस्य करार!

हिंगोली: मराठवाडा व राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि हळद प्रक्रियेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक …